पिंपळनेर : गावरान आंबा दुर्मिळच तरीही संकरितला आला भाव

आंबा www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

आजी-आजोबांनी केलेले व नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आंबे मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने जुनी आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर असून अस्सल गावरान आमरसाची चव दुर्मिळ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

पूर्वी ‘दादा लगाए आम और खाये पोता’ या म्हणी प्रमाणे प्रत्येक गावागावात आमराई अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर-पन्नास झाडे कडक उन्हातही ताठ मानेने उभी होती. मात्र, अलीकडील काळात काही झाडे जुनी झाल्याने वाळून जात आहेत. तर नवीन संकरित, कलमीकरण केलेली विविध जातींच्या आंब्याच्या झाडाची लागवड केली जात आहे. त्यामुळे ग्रामीणभागात आता गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याची झाडे दृष्टीस पडत असल्याचे चित्र आहे. शेंद्र्या, शेप्या, दश्या आदी नावाने ओळखली जाणारी गावरान आंब्याची झाडे व आमराई दुर्मिळ होत आहेत. पूर्वी खेड्यात एकमेकांच्या घरी आंबे देण्याची पद्धत होती. खेड्यातही ही पध्दत लोप पावत आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली असून पूर्वी घराघरां मध्ये गावरान आंबे पिकविण्या साठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढ्यांचा सुगंध जिभेस पाणी आणत असे. पाहुणे मंडळी आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात.

आमरस अन् पुरणाची पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहूणचाराचा खास मेनू असायचा. मात्र, परंपरानुसार सर्व कालबाह्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. शंभर-दिडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्यांची हौस भागवावी लागत आहे. आंब्यांना वातावरणाचाही फटका बसला असून अस्सल गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत. क्वचित ठिकाणी गावरान झाडे कैऱ्यांनी बहरल्याचे चित्र आहे. मध्यंतरी अवकाळीचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी आंबे गळून मोठे नुकसान झाले आहे. नवीन संकरित आंबे कृत्रिम रितीने पिकवलेले खाऊन हौस भागवावी लागणार आहे. तर सर्वांना आवडणारे नैसर्गिक रितीने घरी पिकवलेले गावरान आंब्याची चव चाखायला मिळणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : गावरान आंबा दुर्मिळच तरीही संकरितला आला भाव appeared first on पुढारी.