पिंपळनेर : जि.प. केंद्रशाळेला तीन लाख रुपयांचा निधी मंजूर

देशशिरवाडे www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद शाळांचे निकष नुसार मूल्यांकन करण्यात आले असून पिंपळनेर येथून सुमारे पाच शाळांची जिल्हा अभियान परिषदेतर्फे निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने आदर्श शाळा विकास कार्यक्रम अंतर्गत या शाळांच्या विकासासाठी सुमारे ३ लाख रू.निधी मंजूर झाला आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावे सक्षम करणे हा शासनाचा दृष्टिकोन असून ग्रामीण भारतात व महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने हे मिशन एक अद्वितीय अशी यंत्रणा आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा निर्माण करणे एवढाच मिशनचा हेतू नसून शाश्वत बदलासह गावे सक्षम बनविणे असे मिशनचे उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत व्हि. एस. टी. एफ. आदर्श शाळा कार्यक्रम टप्पा-२ राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांच्या पत्रानुसार धुळे जिल्हयात विविध कामे सुरू आहेत. धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यामधून सुमारे ११०० जिल्हा परिषद शाळांचे निकष नुसार मूल्यांकन करण्यात आले.

त्यामधून शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करू शकणाऱ्या जि.प.केंद्र शाळा देशशिरवाडे ता.साक्री व जि.प. शाळा उभरांडी ता.साक्री, वाऱ्यापानी, रुदावली ता. शिरपूर, जि.प.शाळा खलाने ता.शिंदखेडा अशा जिल्ह्यातून एकूण पाच शाळांची जिल्हा अभियान परिषदेतर्फे निवड करण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने आदर्श शाळा टप्पा -२ अभियानाची शाळा व गावस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जि.प. केंद्रशाळा देशशिरवाडे शाळेला आदर्श शाळा विकास कार्यक्रम अंतर्गत अभियानात कार्यरत जिल्हा समन्वयक विशाल नागनाथवार तथा रणदिवे यांनी भेट दिली. आदर्श शाळा विकास कार्यक्रम अंतर्गत शाळेला अभियाना मार्फत शाळा विकासासाठी सुमारे ३ लाख रू.निधी प्राप्त होणार असून विकास आराखड्यानुसार तो निधी वापरता येणार आहे असे सांगण्यात आले आहे. यावेळी साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, एस.व्ही ठाकरे, एल.एन.पाटील हे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या प्रेरणेतून प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, राजेंद्र पगारे, एस. व्ही.ठाकरे, एल.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनातून शाळेची निवड करण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापिका संगिता रायते, अनिल काकुस्ते, महेंद्र महाले, उज्वला सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : जि.प. केंद्रशाळेला तीन लाख रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.