पिंपळनेर : दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमार ; सहा गो-रक्षकांवर गुन्हा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमारीची घटना घडली आहे. गोऱ्हे घेवून जाणाऱ्या ट्रक रस्त्यात अडवित गो-रक्षक असल्याचे सांगत सहा जणांनी ट्रक चालकासह दोघांना बेदम मारहाण करीत ४० हजारांची रोकड लुटून नेली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ट्रकचालक शेख फिरोज शेख रशिद (३३, रा.अंबिका नगर, जुना वडजाई रोड, धुळे) याने साक्री पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ते पहाटे पावणे पाचच्या सुमारास ट्रकमधून (क्रं.एमएच १८ एए ५८४५) १० गायींचे पिल्लू गोऱ्हे) भरुन विसवाडी येथून धुळे येथे घेवून जात होते. तेव्हा दहीवेल येथील इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाजवळ भूषण पाटील (रा.नंदुरबार) देवेश शिंदे (रा.पिंपळनेर) प्रविण मंडलीक (रा.धुळे) व इतर तीन जणांनी त्यांच्या ताब्यातील बोलेरो वाहन अचानक ट्रकच्या समोर थांबवले. त्यांनी चालकाला वाहनात काय आहे, अशी विचारणा केली असता चालकाने गाडीत गाईचे पिल्लू असल्याचे सांगितले. तेव्हा सहाही जणांनी आम्ही गो-रक्षक असल्याचे सांगितले. ट्रकचालक शेख रशिद व सहचालक साबीर शेख यांना वाहनाच्या खाली उतरविले. हातातील लाठया काठया व लोखंडी पाईपने दोघांना मारहाण केली. तर चालक शेख यांच्या डोक्याला व हातापायास तर साबीर शेख यास तोंडाला व हातापायांना मारहाण करीत दुखापत केले. तर भुषण पाटील याने साबीर शेख यांच्या खिश्यातून ४० हजार रूपये जबरीने काढून घेतले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर .व्ही. निकम करीत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : दहिवेल शिवारात भल्या पहाटे लुटमार ; सहा गो-रक्षकांवर गुन्हा appeared first on पुढारी.