पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

जिद्द आणि कष्ट करण्याची इच्छा असली की, कोणत्याही गोष्टीवर सहज मात करून यश मिळविता येते. याचा प्रत्यय प्रज्ञाचक्षु असलेल्या सोपान विष्णू सोनवणे या तरुणाने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशावरुन येते. यशाला गवसणी घातल्यामुळे सोपानची सेंट्रल बँक शाखेत निवड झाली आहे.

देशशिरवाडे येथील सोपान सोनवणे हा अभ्यासात हुशार मुलगा असून त्याने बारावीत ६७ टक्के गुण मिळवून गावातून प्रथम क्रमांक मिळवला. भविष्यात काय व्हायचे असे त्याला तेव्हा विचारले असता, त्याने बँक अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा त्याने ध्यास घेतला होता. त्याची प्रबळ इच्छा व बँक अधिकारी होण्याच्या स्वप्नासाठी अभ्यासाच्या जोरावर सोपानने यश मिळवले. त्याच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून सोपान या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याची सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निवड करण्यात आली असून अद्याप शाखा मिळालेली नाही. प्रज्ञाचक्षु असतानाही बँकेची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच आई हिराबाईच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने लगेचच गावभर पेढेही वाटले. ग्रामस्थांनीही सोपानच्या यशाचे कौतुक केले आहे. इतरांनीही सोपानपासून प्रेरणा घ्यावी असा त्याचा प्रवास ठरला आहे.

महाराष्ट्र दिनी सोपानला ध्वजारोहण करण्याचा मान
सोपानने मिळविलेल्या यशाची पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नारायण शिंदे यांनी दखल घेतली. त्यानुसार उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सोपान व त्याच्या आईच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा त्याच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण असणार आहे. सोपानला सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप यांनी मदत केली आहे.

कठीण परिस्थीतीतही पूर्ण केले शिक्षण
साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून तीन किलोमीटर अंतरावरील देश शिरवाडे गावातील विष्णू बंडू सोनवणे व हिराबाई विष्णू सोनवणे यांचा सोपान हा मुलगा असून त्यांची आर्थिक हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना राहायला स्वत:चे घर नाही. वडिलही प्रज्ञाचक्षु असल्याने  संपूर्ण कुटुंबाचा भार आई हिराबाई  यांच्यावरच होता. सोपानला लहानपणी दिसायचे परंतु त्याच्या डोळ्याला मार लागल्यानंतर त्याची दृष्टी गेली. एकुलता एकच मुलगा त्याचेीर दोन्ही डोळे गेल्यावर आईला दुःख झाले. परंतु आई हिराबाईने हिम्मत सोडली नाही. अशाही परिस्थितीत सोपानने बीएपर्यंत शिक्षण घेतले  आणि यश संपादन केले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण appeared first on पुढारी.