पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील शेणपूर येथील निखिल शरद काळे यांच्या शेतातील गट नं.४४१/१ मध्ये मक्याच्या चाऱ्याला विद्युत वाहिनीच्या तारा लोंबकळत असल्याने शाॅटसर्किटमुळे स्पार्किंग होऊन आगीचे गोळे पडल्याने सुमारे पाचशे क्विंटल मक्याच्या चाऱ्याची गंजी जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, दि. 4 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याचे स्थानिक शेतमजुरांनी सांगितले. त्यामुळे महावितरणचा दुर्लक्षित कारभार पुन्हा उघडकीस आला आहे.

भीषण आग लागल्याने ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. तर रात्री साडेसात ते साडेआठ पर्यंत गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. घटनास्थळी जवळच एका शेडमध्ये गोठ्यात काही जनावरे बांधलेली होती. मात्र प्रसंगावधान राखून लगेचच जनावरे तेथून हलविण्यात आली मात्र संपूर्ण शेड जाळून खाक झाले. त्यानंतर तेथील काही अंतरावरील कांदा चाळीत सुमारे ३० क्विंटल कापूस ठेवलेला असल्याने त्वरीत गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तेथपर्यंत आग पोहोचू दिली नाही. त्यामुळे कापूस वाचला. आगीचे लोळ उठल्याने आगीवर नियंत्रण आणणे कठीण झाले होते. आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे विद्युत प्रवाहाच्या लोंबकळणाऱ्या वीजतारा असल्याचे सांगण्यात आले. महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे एका सामान्य शेतकऱ्याचे सुमारे पाचशे क्विंटल मक्याचा चारा ऐन उन्हाळ्यात जळून खाक झाला आहे. उन्हाळ्यातील चाऱ्याचे महत्व एका शेतकऱ्याहून दुसरा कुणालाही कळणार नाही. हाता तोंडापाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम महावितरणाच्या चुकीच्या कामकाजामुळे झाले असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. येथील शेतीपंपाची लाईट सुरू असल्यामुळे विहिरीच्या पाण्याद्वारे पाईपलाईनने आग विझवण्यास मदत झाली. सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु महसूल व विद्युत विभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून शक्य तेवढा योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ऐन उन्हाळ्यात शेतक-याला पशुधन वाचविण्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद शासनाकडून करावी. तसेच परिसरातील लोंबकळणाऱ्या वीजतारा, वेडेवाकडे विद्युत पोल, जळालेल्या केबल या सर्व वस्तूंचा पुरवठा महावितरणने करून भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला आळा घालावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून यावेळी करण्यात आली. घटनास्थळी शेणपूरचे सरपंच चंद्रकांत काळे, उपसरपंच दादाजी थोरात, सदस्य नंदकुमार काकुस्ते, आकाश काकुस्ते, पृथ्वीराज काकुस्ते, ग्रामसेवक निकम, तलाठी जाधव, कोतवाल मोहिते पोलीस पाटील, हेमराज काळे, सुनील काळे, चंद्रशेखर अहिरराव, प्रवीण काकुस्ते, कनिष्ठ अभियंता राऊत व त्यांचे कर्मचारी पथक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक appeared first on पुढारी.