पिंपळनेर : साक्रीला उपजिल्हा रुग्णालय इमारतीचा प्रस्ताव मंजूर – आ. गावित

आ. मंजुळा गावित www.pudhari.news
पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा 
साक्री येथे कार्यरत असलेले ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीचे बांधकामाचा प्रस्तावास मंजूरी मिळवत साक्री विधानसभा संघाला आ. मंजुळा गावित यांनी तालुकावासीयांना दिवाळीची भेटच दिली आहे.
साक्री येथे सध्या कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी आ. गावित या शासनाकडे पाठपुरावा करीत होत्या. साक्री येथे अस्तित्वात असलेले ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाने सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा दि.१७ जानेवारी २०१३ रोजी मंजूर केला होता. परंतु योग्य पाठपुरावा न झाल्याने हा प्रश्न शासनदरबारी आजतागायत प्रलंबित होता. इमारत बांधकामाचा प्रश्न सुटावा म्हणून मंजुळा गावित निवडून आल्यानंतर सर्वप्रथम तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या जागेवर १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी जागा शोधण्यापासून पाठपुरावा केला असता या उपजिल्हा रुग्णालयासाठी मौजे माहणे ता. साक्री येथील गट नं. ४६४ मध्ये साधारणतः २ हेक्टरच्या आसपास जागा जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून भाडणे येथील जागा मंजुर करून घेतली.
जागेचा प्रश्न सुटल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शासकीय रुग्णालयाचे अधिकारी यांची बैठक घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकामाचा आराखडा, नकाशे अंदाजपत्रक तयार करून घेतले. त्यानंतर आ. गावित यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत व महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी हायपॉवर कमिटीची बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली असता आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत साक्री उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाच्या कामास मंजुरी देवून आरोग्य विभागाने तत्काळ इमारत बांधकामाचा प्रस्ताव  मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नवखळे यांच्याकडे अंतिम छाननीसाठी पाठवावा, असा निर्णय झाला. त्यामुळे साक्री उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या बैठकीस आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ.मंजुळा गावित यांचेसह आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, सा. बां. विभाग धुळे च्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, उपअभियंता बिरारीस, कनिष्ठ अभियंता मनोज करनकाळ उपस्थित होते.
पुढील महिन्यात हायपॉवर समितीची बैठकीचे आयोजन….
या संदर्भात पुढील महिन्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या दालनात आरोग्य विभागाचे सचिव, बांधकाम विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत हायपॉवर समितीची बैठक होणार असल्याची माहिती आ. गावित यांनी दिली आहे. या बैठकीस आमदार मंजुळा गावित यांच्यासह धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय रुग्णालय धुळे यांना देखील आमंत्रित केले जाणार आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : साक्रीला उपजिल्हा रुग्णालय इमारतीचा प्रस्ताव मंजूर - आ. गावित appeared first on पुढारी.