पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

होर्डिंग, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून, ज्या-ज्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत त्यांची स्थिरता प्रमाणपत्र म्हणजेच संरचना मजबुती पालिकेकडून तपासली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने नगररचना विभागाने खासगी व मनपाच्या जागेत उभारणी केलेल्या होर्डिंग्जची मजबुती तपासण्याकरिता सिव्हिल टेक, मविप्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व संदीप पॉलिटेक्निक या त्रयस्थ संस्थांची नेमणूक केली आहे.

या संस्थांमार्फत शहरातील फलकांची मजबुती तपासणीकरिता जबाबदारी निश्चित केली आहे. विभागीय कार्यालयाच्या हद्दीत फलक लावणाऱ्या फलकधारकांना विभागीय कार्यालयामार्फत संबंधित विभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधित संस्थेकडून मजबुती प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन दिवसांच्या आत नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात येणार आहे. नोटीस बजावल्यानंतर संबंधित फलकधारकांवर पूर्तता करण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयातील जाहिरात व परवाने विभागातील संबंधित कर्मचारी व संबंधित विभागीय अधिकारी यांची राहील. मजबुती प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल) सादर करण्याचे दायित्व संबंधित फलकधारकाचे असून, त्यानुसार नियुक्त संस्थेची मजबुती प्रमाणपत्राकरिता आकारण्यात आलेल्या शुल्काची रक्कम संबंधित फलक लावणाऱ्यांची राहील.

संबंधिताने फलक उभारणी केलेल्या स्ट्रक्चरकरिता आकाश-चिन्ह मजबूत करण्यासाठी त्यात जी वाढ करावयाची असेल, ती महापालिकेच्या संबंधित विभागाच्या परवानगीने तातडीने करणे बंधनकारक आहे. नमूद संस्थेने जे आकाश-चिन्ह/जाहिरात फलक धोकादायक व वापरायोग्य नसलेले आकाश-चिन्हांबाबत अहवाल सादर केल्यास असे आकाश-चिन्ह तातडीने निष्कासित करण्यात येतील. दिलेल्या मुदतीत धोकादायक फलक काढून न टाकल्यास महानगरपालिका खर्चाने अतिक्रमण विभागामार्फत विहित मुदतीत ते काढून टाकेल. त्याकरिता येणारा सर्व खर्च संबंधित फलकधारकाकडून वसूल करण्यात येईल. तसेच संबंधित संस्थेने मजबुती प्रमाणपत्र, स्ट्रक्चर ऑडिट अहवाल सादर न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्याचा अहवाल तातडीने उपआयुक्तांनी सादर करावा. त्या-त्या विभागातील कार्यवाहीची जबाबदारी संबंधित विभागीय कार्यालयातील जाहिरात व परवाने विभाग तसेच नोडल अधिकारी तथा विभागीय अधिकारी यांची राहील. सहाही विभागांतील सर्व नोडल अधिकारी तथा विभागीय अधिकारी यांनी योग्य पद्धतीने कार्यवाही केल्याची खात्री करण्यासाठी आढावा घेऊन उपआयुक्त (कर) यांच्याकडे अहवाल सादर करण्यासाठी जाहिरात व परवाने विभागातील सहायक अधीक्षक मनोज संगमनेरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

खासगी जागेवर ९३४ फलक : उत्पन्न सव्वादोन कोटी

मनपाच्या जागेवर ३५ फलक: उत्पन्न ८.५ कोटी

हेही वाचा : 

The post पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला 'हा निर्णय appeared first on पुढारी.