प्रकाश आंबेडकर यांचा नाशिकमध्ये अचानक दौरा

प्रकाश आंबेडकर www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी (दि. 6) अचानक नाशिकला भेट देऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचा हा दौरा नेमका कशासाठी होता हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांच्यात युती होणार, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने त्या दृष्टीनेही प्रकाश आंबेडकर यांच्या नाशिक दौर्‍याचे विविध अर्थ काढले जात आहेत.

महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही 2024 मध्ये होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने या सर्व निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे नाशकात पक्षाची पाळेमुळे घट्ट करून या सर्व निवडणुका कॅश करता येतात का, यादृष्टीने पक्षातर्फे जोरदार रणनीती आखण्यात येत असून, त्यामुळेच आंबेडकर यांच्या नाशिक भेटी वाढल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र रविवारी शासकीय विश्रामगृहावर दिसले. नाशिक महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा मानस पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर आणि जिल्ह्यात मजबूत व्हावी तसेच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची अभेद्य फळी असावी यासाठी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आंबेडकर यांची भेट घेऊन पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी केलेल्या कामांची माहिती सादर केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा:

The post प्रकाश आंबेडकर यांचा नाशिकमध्ये अचानक दौरा appeared first on पुढारी.