बच्चू कडू यांना वर्षभर कारावास, नेमके प्रकरण काय?

बच्चू कडू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांग निधीसंदर्भात निवेदन देताना मनपाचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्ययालयाने आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना वर्षभर कारावास व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. कडू यांनी जामीनासाठी अर्ज केल्याने त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या निधी खर्चाबाबत प्रहार संघटनेच्या वतीने २४ जुलै २०१७ रोजी आंदोलन करण्यात आले होते. कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना निवेदन देण्यासाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी मनपा मुख्यालयात गेले. त्यावेळी मनपा आयुक्तांच्या खुर्चीमागे असलेल्या दिव्यांग बांधवांना समोरील खुर्चीत बसण्यास कृष्णा यांनी सांगितल्याचा राग आल्याने कडू यांनी कृष्णा यांना शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी मनपा प्रशासनाचे माजी उपआयुक्त हरीभाऊ फडोळ यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात कडू विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व शिवीगाळ प्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपासकरून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सचीन गोरवाडकर यांनी युक्तीवाद केला.

या खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधिश विकास कुलकर्णी यांनी कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक वर्ष व शिवीगाळ केल्याप्रकरणी एक वर्ष शिक्षा ठोठावली. तसेच दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कडू यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या हक्काचा निधी खर्च केला नाही म्हणून आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी काम का केले नाही याचा जाब न विचारता आमच्यावर गुन्हे दाखल करून शिक्षा सुनावली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कायद्याचा अतिरेक होत असून अधिकारी त्याचा कवच म्हणून वापर करत आहेत. या कायद्याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहे.

– आमदार बच्चू कडू

हेही वाचा :

The post बच्चू कडू यांना वर्षभर कारावास, नेमके प्रकरण काय? appeared first on पुढारी.