Site icon

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक असल्याने कांद्याचे बाजारभाव २०० ते ४०० रुपयांपर्यंत कोसळले. हवालदिल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेडमार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत १२ हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली. मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी बंद करण्यात आल्याने ‘खोदा पहाड निकला चूहा’ या म्हणीला तंतोतंत घटना कांदा उत्पादकांच्या बाबतीत घडली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सकाळच्या सत्रात 400 वाहनांतून लाल कांद्याची तर 300 वाहनांतून उन्हाळ कांद्याची अशी 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. याला कमाल 851 रुपये, किमान 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर नव्याने येत असलेल्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची स्थिती काहीशी अशीच आहे. लाल कांद्याला कमाल 990 रुपये, किमान 600 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, अशी स्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळामध्ये शासनाना वेठीस धरल्याने नाफेडची शेतकरी प्रोड्यूसर कंपनीमार्फत लाल कांदा खरेदी सुरू झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्टात येताच सर्व सदस्य आपापल्या मतदारसंघांमध्ये निघून गेले आणि सुरू असलेली नाफेडची कांद्याची खरेदी बंद करण्यात आल्याने राज्यातील तसेच खास करून नाशिकच्या कांदा उत्पादकांची फसवणूक केली आहे. तसेच कांद्याच्या पिकांची ई-नोंद असेल तर 350 रुपये प्रतिक्विंटला अनुदान मिळेल, हे राज्य सरकारने जाहीर केले पाहिजे होते. यामुळे राज्य सरकारबाबत कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे पिंपळगाव बसवंत येथे दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची फसवणूक झाली आहे. कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

केंद्राने सुरू केलेल्या नाफेडच्या खरेदीने फार काही बाजारभावात सुधारणा झालेली नव्हती. मात्र ज्या पद्धतीने शासनाने गाजावाजा केला त्याचा काहीच फायदा कांदा उत्पादक शेतकरीवर्गाला झाला नाही.

– निवृत्ती न्याहारकर, शेतकरी संघर्ष संघटना, लासलगाव

गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला भाव नाही. त्यात प्रथमच लाल कांदा खरेदीची नाफेडमार्फत खरेदीची घोषणा झाली. मात्र १५ दिवसांत खरेदी बंद केल्याने बाजारभाव कोसळले आहे. आता शेतात पिकवायचे तरी काय असा प्रश्न पडला आहे.

– शेखर कदम, शेतकरी, कातरणी

लाल कांद्याची आवक संपुष्टात आल्याने उन्हाळ कांद्याची आवक बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्रव्यवहार करून पुन्हा खरेदी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

– सुवर्णा जगताप, माजी सभापती लासलगाव बाजार समिती

लाल कांदा खरेदी जरी बंद झाली असली तर नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदीबाबत प्रक्रिया सुरू आहे.

– अशोक ठाकूर, नाफेड संचालक, नवी दिल्ली

———

हेही वाचा : 

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Exit mobile version