बस दुर्घटना : अपघातस्थळ मिरची चौकातील कामांना वेग

मिरची चौक www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर ‘हॉट ब्लॅक स्पॉट’बाबत आता महापालिका प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. या भागातील अतिक्रमण काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, चौक दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला आहे. या चौकात सूचनाफलक लावण्यात आले असून, गतिरोधक (हम्प) व दुभाजकही टाकण्यात आले आहेत.

बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरची चौकातील आणि महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या छाटण्यात येऊन दृश्यमानता वाढवण्यात आली आहे. रस्त्याच्या चारही बाजूंना स्वच्छता करण्यात आली आहे. वाहनधारकांसाठी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. जयशंकर गार्डनकडून येणारे वळण वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. तसेच, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांशीही चर्चा केली असून, मार्गातील ट्रान्स्फॉर्मर व टर्निंग पॉइंटवरील विद्युत पोल हटविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ओव्हरहेड वायर अंडरग्राउंड करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. नगर नियोजन विभागाने अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांचे डिमार्केशन करून दिल्यानंतर संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरणदेखील करण्यात येणार आहे. या चौकात गतिरोधक व दुभाजक बसवण्यात येत असून, त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या ड्रमलादेखील रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहेत. मनपाने नोटीस दिलेल्या व रेड मार्किंग करण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही राजकीय व्यक्तींची मुख्य रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे ‘जैसे थे’च आहे. या संपूर्ण मोहिमेत पंचवटी बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र घोडके, प्रकाश निकम, शाखा अभियंता पंकज बाप्ते, मनीष ओगले, सुनील थळकर, भाऊसाहेब अशीवाल यांनी सहभाग नोंदविला.

नोटिसा बजावूनही अतिक्रमणे ‘जैसे थे’च :
मिरची चौकासह आजूबाजूच्यापरिसरातील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, यातील काही सामान्य नागरिकांनी त्यांची अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे, मात्र याच चौकातील मुख्य भागात अतिक्रमण केलेल्या राजकीय पुढार्‍यांनी मात्र अतिक्रमणे काढण्याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. नोटिसा बजावूनही अद्याप अतिक्रमणे ‘जैसे थे’च असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे त्यांची अतिक्रमणे नक्की निघतील की नेहमीप्रमाणे सामान्यांवरच कारवाई होईल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रिंग रोड समांतर करण्याची गरज
अमृतधामकडून जयशंकर गार्डनकडे जाणारा रिंग रोड मिरची चौकातून पुढे समांतर रेषेत नसल्याने वाहनांना सिग्नल क्रॉस करताना चौकामध्येच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळेच अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. रिंग रोड समांतर कसा करता येईल, यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेदेखील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा:

The post बस दुर्घटना : अपघातस्थळ मिरची चौकातील कामांना वेग appeared first on पुढारी.