बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
भारताची बांगलादेशाबरोबर कांदा निर्यात तत्काळ सुरू करावी, याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. लवकरात लवकर निर्यात सुरू करण्याबाबत विनंती त्यांनी केली आहे.

कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात देशातील वाटा 30.03 टक्के आहे, तर यंदा मुबलक प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाल्याने कांदा लागवडीचा खर्च बघता तसेच कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकर्‍यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले असल्याची वस्तुस्थिती ना. डॉ. पवार यांनी मांडली. भारत सरकारकडून कांद्याची निर्यात खुली करण्यात आली असून, बांगलादेशाने भारतातून कांद्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारकडे योग्य स्तरावर विषय मांडावा, जेणेकरून बांगलादेशात कांद्याची निर्यात लवकर सुरू करता येईल. त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे.

…तर व्यापार्‍यांना मिळणार दिलासा
आजमितीस बांगलादेशात भारतातून बंद असलेली कांदा निर्यात सुरू झाल्यास कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापार्‍यांना दिलासा मिळेल, असे ना. डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी ना. गोयल यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे ना. डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

The post बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट appeared first on पुढारी.