बांधकाम साहित्य महागल्याने घराचे स्वप्न दुरावले

नाशिक : सतीश डोंगरे 

पावसाळा आणि हिवाळ्यात बांधकाम क्षेत्रात काहीशी मंदी येत असल्याने, त्याचा परिणाम बांधकाम साहित्य स्वस्त होण्यावर होत असतो. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा बांधकाम क्षेत्रात तेजी येत असल्याने, बांधकाम साहित्याच्या दरातही मोठी वाढ होत असते. लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार असल्याने, पुन्हा एकदा बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर झाला असून, घरांचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जून, जुलै महिन्यांत स्टीलचे दर ९० हजार रुपये प्रतिटनापर्यंत गेले होते. त्यापूर्वी स्टीलचा दर ४५ हजार रुपये प्रतिटन होता. त्यामुळे वाढत्या दरामुळे बांधकाम क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाळा सुरू होताच, पुन्हा एकदा स्टीलचे दर कमी झाले होते. डिसेंबर २०२२ पर्यंत स्टीलचे दर ४५ ते ५० हजार प्रतिटनापर्यंत घसरले होते. आता बांधकाम क्षेत्रातील तेजी परतल्याने, पुन्हा एकदा स्टीलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत स्टीलचा दर ६६ हजारांपेक्षा अधिक प्रतिटन इतका झाला आहे. विशेष म्हणजे स्टीलचे दर सातत्याने वाढतच आहेत. त्याचबरोबर सिमेंटच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. ३५० रुपयांपासून ते ४५५ रुपयांपर्यंत आहेत. कंपन्यांनुसार सिमेंटचे दर असून, पुढच्या काळात यात आणखी भर पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

त्याव्यतिरिक्त विटांच्या दरातही मोठी वाढ झाली असून, प्रतिहजार विटांसाठी साडेपाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर वाळूच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. किंबहूना वाळूची अजूनही टंचाई असून, बांधकाम क्षेत्रापुढे हा मोठा प्रश्न आहे. तसेच मूरंग, गिट्टी, बारचे भावदेखील वाढतच आहेत. दरम्यान, वाढत्या दरांमुळे घरांच्या किमती वाढत असून, सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होताना दिसत आहे. सध्या शहराच्या चहुबाजूने घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत.

कुशल मनुष्यबळाची टंचाई

कुशल मनुष्यबळ ही बांधकाम क्षेत्रासमोरची मोठी समस्या आहे. सध्या शहराच्या चहुबाजूने बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. मात्र, कुशल मनुष्यबळ नसल्याने बांधकाम व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम क्रेडाईकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, अशातही कुशल मनुष्यबळाची टंचाई कायम आहे.

स्टीलचे दर

१० ते २५ मिमी स्टील – ६५ हजार २०० रु. प्रतिक्विंटल

८ ते ३२ मिमी स्टील – ६६ हजार ७०० रु. प्रतिक्विंटल

६ मिमी स्टील – ६६ हजार ७०० रु. प्रतिक्विंटल

(गेल्या वर्षीच्या प्रारंभी स्टीलचे दर ४५ हजार प्रतिक्विंटलपर्यंत होते)

सिमेंटचे दर

४३ ग्रेड – ३३० ते ३७० रु. प्रतिबॅग

५३ ग्रेड – ४१० ते ४५५ रु. प्रतिबॅग

वाळूचे दरही वाढले

वाळूची टंचाई हे बांधकाम क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जिल्हा प्रशासनाने उत्खननावर बंदी घातल्याने वाळू उपलब्ध होणे अवघड झाले आहे. अशात बहुतांश बांधकामे वाळूऐवजी कच वापरून पुर्ण केली जात आहेत. गेल्या वर्षी वाळूचा दर ३० रुपयांवरून ४५ रुपये प्रतिघनफुटांपर्यंत गेला होता. आता त्यात आणखी मोठी भर पडली आहे.

इंधनाच्या किमतींकडे लक्ष

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केल्याचा निर्णय घेतल्याने इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती स्थिर असल्या, तरी त्या 100 रुपयांच्या पार असल्याने त्या कमी केल्या जाव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. किमती कमी झाल्यास त्याचा परिणाम बांधकाम साहित्याचे दर कमी होण्यावर होईल, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

हेही वाचा : 

The post बांधकाम साहित्य महागल्याने घराचे स्वप्न दुरावले appeared first on पुढारी.