बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

बालविवाह www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक कृती आराखड्याची सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी, दि.27 रोजी दिले.

बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सातपुडा सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे, शिक्षणाधिकारी मोहन देसले (माध्यमिक), बाल कल्याण समिती सदस्य हेमंत भदाणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण, बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, चाईल्डलाईनचे संचालक मीना भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, धुळे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभाग आदिंची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी पाच विभागांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी दहावी अनुत्तीर्ण मुलींची यादी तयार करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावेत. आश्रमशाळा व निवासी शाळांवर लक्ष केंद्रित करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासांची माहिती द्यावी. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या अटींमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती करणे हा निकष ठेवावा. तसेच शाळांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावर निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे. बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयावर लघुपटाची निर्मिती करून शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, पंचायत व आरोग्य विभागातर्फे माता-पालक बैठक, किशोरी मेळाव्यातून जनजागृती करण्याचे शिक्षण विभागास सूचित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सांगितले की, बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळांमध्ये कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे यांनी जिल्ह्यात बालविवाह निमुर्लनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बालविवाहाबाबत येथे कळवा..
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याचे नागरीकांनी हेल्पलाईन क्रमांक 1098, जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. बालविवाहाच्या दुष्परिणामाबद्दल मुलींबरोबरच मुलांमध्ये देखील जनजागृती होणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

The post बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.