भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा १०० गावांमध्ये एकाचवेळी प्रदान सोहळा

गौतम बुद्ध,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्या वतीने दि. २ मे रोजी नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये एकाचवेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार असून, यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती बीएमए ग्रुपचे संस्थापक मोहन आढांगळे यांनी दिली.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहन आढांगळे यांनी सांगितले की, सम्राट अशोक जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान बुध्द जयंती तथा बुद्ध पौर्णिमा यानिमित्त दि. २३ एप्रिल ते २ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामणेर शिबिर घेण्यात येणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात विविध तालुक्यांमधील १०० गावांना भगवान बुद्ध यांच्या १०० मूर्ती प्रदान करण्यात येणार आहेत.

या मूर्ती साडेपाच फूट उंच असून, फायबर मेटलपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. या बुद्धमूर्ती प्रदान सोहळ्यानिमित्त दि. २ मे रोजी नाशिक शहरातून १०० बुद्ध मूर्ती सजवलेल्या १०० रथांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तपोवनातून या मिरवणुकीस प्रारंभ होणार असून, ही मिरवणूक जुना आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, एमजी रोड, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब येथे येणार आहे. येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामणेर शिबिर तथा प्रबोधन सभेत होणार आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, प्रबोधनकार सीमा पाटील व जॉली मोरे यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे, असेही आढांगळे यांनी सांगितले.

या सर्व कार्यक्रमांच्या तयारी संदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी भदन्त शीलरत्न, के.के.बच्छाव , वाय.डी.लोखंडे, संजय भरीत, आर.आर.जगताप, पी.डी.खरे, बाळासाहेब सिरसाट, भास्कर साळवे, नानासाहेब पटाईत, अशोक गांगुर्डे, रमेश भामरे, अशोक पवार, प्रकाश दाणी, नीलेश केदारे, अमोल अहिरे, मनोहर अहिरे, मधुकर पगारे, बबन काळे, सागर गांगुर्डे, सुनील वाघमारे, आत्माराम वानखेडे आदींसह बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: 

The post भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा १०० गावांमध्ये एकाचवेळी प्रदान सोहळा appeared first on पुढारी.