भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ११ माजी नगरसेवकांसह एका मनसे पदाधिका-याने आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. या अकराही नगसेवकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले असून नाशिकचा सर्वांगिण विकास केला जाईल. भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या बाराजणांचे मी मनापासून स्वागत करतो. तुमच्या पाठीशी आम्ही खंभीरपणे उभे आहोत.  अजय बोरस्ते यांनी ते शिंदे गटात का आले याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या राज्यात ख-या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले आहे. बाळासाहेबांची भूमिका घेवून सरकार स्थापन झाले, तेव्हापासून राज्यभरातून शिंदे गटात हजारो कार्यकर्ते सामील होत आहेत. लोक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत, आमच्या सोबत येत आहेत. कारण आमची भूमिका महाराष्ट्राला पटली असून  लोकमान्यता मिळाली आहे. खरे तर जे 2019 मध्येच व्हायला पाहीजे होते ते आम्ही मागच्या काही महिन्यांपूर्वी केले. तेव्हापासून आम्ही जिथे जिथे जातोय तिथे  हजारो लोक स्वागतासाठी उभे राहताय. त्यामुळे आमची भूमिका लोकांनी मान्य केल्याचे समाधान आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. 50 आमदार बाळासाहेबांची भूमिका घेऊन बाहेर का पडतात? याचे आत्मचिंतन शिवसेनेने करायला हवे, मात्र, याउलट आम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नाशिकचा विकास करु, नाशिकचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे यासाठी सरकार अग्रेसर राहील.नाशिकमध्ये विकासाची गंगा आली पाहीजे यासाठी काम करु, भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा :

The post भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द appeared first on पुढारी.