भाजपच्या पालकमंत्री पदाचा बाण शिंदे गटाच्या भात्यात

बाण www.pudhari.news

कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ

भाजपचे नेते ना. गिरीश महाजन यांची जागा (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री पदाच्या रूपाने घेतल्याने शिंदे गटासाठी तो बूस्ट मानला जात आहे, तर दुसरीकडे नाशिकमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत ही नाराजी कशाप्रकारे व्यतित होते, यावर शिंदे गट आणि भाजपमधील स्थानिक पातळीवरील नातेसंबंध अवलंबून असतील. नाशिक महापालिकेत सत्ता उपभोगलेल्या भाजपला अधिक बूस्ट मिळावा, यासाठी खरे तर पालकमंत्री पदावर भाजपचाच दावा अधिक मजबूत होता. असे असताना, शिंदे गटाकडे पालकमंत्री पद गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच येईल, असा विश्वास अजूनही भाजपच्या मंडळींना वाटत आहे.

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खरी फाइट हाेईल, ती शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्यामध्ये. हे निवडणुकीबाबतचे चित्र कालपर्यंत होते. परंतु, महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचल्यानंतर भाजपला शिवसेनेची (शिंदे गट) जोड मिळाल्याने नाशिकसह सर्वच ठिकाणच्या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. अशा स्थितीत ठाकरे गटाचे पानिपत करण्यासाठी भाजपकडून शिंदे गटाला बूस्ट देण्यावाचून गत्यंतर नाही. त्या अनुषंगानेच भाजपकडून शिंदे गटाला बळ देण्याचे काम जाणूनबुजून केले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकबाबत विचार केल्यास भाजपने आपल्या पालकमंत्री पदाचा बाण मुद्दामच शिंदे गटाच्या भात्यात टाकला आहे. त्यामुळे शिंदे गटाला नाशिकमध्ये ताकद मिळून हीच ताकद भाजपला ठाकरे गटाच्या विरोधात वापरता येणार आहे. त्याशिवाय नाशिकमधून ठाकरे गटाच्या प्रवीण तिदमे या एकाच माजी नगरसेवकाला फोडण्यात शिंदे गटाला यश मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या अभेद्य एकजुटीला सुरूंग लावण्याची जबाबदारी पालकमंत्री रूपाने दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यावर साेपवलेली दिसते. त्याचाच परिपाक महापालिकेत ना. भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या निमित्ताने दिसून आला. या बैठकीला केवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचाच बोलबाला होता. भाजपच्या पदाधिकारी व आमदारांना या बैठकीला बोलावले गेले नाही की, त्यांनीच मुद्दाम येणे टाळले, हा चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात चांगलाच चघळला गेला.

पालकमंत्री भुसे यांनी नाशिक आणि ग्रामीण भागात राबवण्यात येणारी विकासकामे, प्रकल्प तसेच योजनांची इतकी स्वप्ने दाखवली आहे की, पुढील अनेक वर्षे या योजना फलद्रुप होऊ शकत नाहीत आणि तोपर्यंत सत्तांतराचा खेळ कसा रंगतो, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिंगरोड, तीर्थक्षेत्रांचा विकास तसेच नमामी गोदा या बाबी २०२७ पर्यंत शक्य आहे. या व्यतिरिक्त नाशिकला एज्युकेशन हब बनवणे, उद्योग व्यवसायात वाढ करणे, या बाबी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी त्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. खरे तर गेल्या १३ वर्षांहून अधिक काळापर्यंत महापालिकेत नोकर भरती होऊ शकलेली नाही. शहराचा वाढता विस्तार पाहता, नाशिक मनपाची क वर्गातून ब वर्गात बढती झाली आहे. असे असताना नवा आकृतिबंध दूर परंतु, जुन्या आकृतिबंधानुसारदेखील भरतीला राज्य शासनाकडून वारंवार खोडा घातला जात आहे. येऊन-जाऊन आस्थापना खर्चाकडे बोट दाखवले जाते. एकीकडे कंत्राटी भरती करण्यासाठी ठेकेदारांना रेड कार्पेट दाखवायचे आणि दुसरीकडे नियमित भरतीसाठी नियमांकडे बोट दाखवायचे, असाच उद्योग राज्य शासनाकडून सुरू आहे. याआधीच्या युती सरकारने, त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारने हाच कित्ता गिरवला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक विकासकामे आणि योजनांची भरती महापालिकेत येईल. परंतु, नोकर भरतीबाबत सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागेल. याचे कारण सात हजार कर्मचाऱ्यांचे काम आज चार हजार कर्मचारी करत आहेत. या मनुष्यबळात नाशिक महापालिकेचा महसूल कसा वाढणार आणि महसूल वाढणार नसेल, तर आस्थापना खर्चही आटोक्यात कसा राहील, याचा विचार सरकारने करावा, अशी अपेक्षा आहे.

शिंदे गटाच्या वाटेवर अनेक जण

ना. दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सुहास कांदे या तीन नेतेमंडळींकडे नाशिकमधील शिंदे गटाचे वर्चस्व वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हाती सत्ता असली, तरी अनेक जण शिंदे गटात प्रवेश करताना जरा सबुरीनेच घेत आहेत. सर्वेाच्च न्यायालयातील प्रकरण आणि निवडणूक आयोगाकडे असलेल्या दाव्याचा निकाल काय लागतोय, यावरही बरेच काही अवलंबून आहे. अपेक्षित निकाल लागला, तर शिंदे गटाकडे ठाकरे गटातील अनेकांच्या रांगा लागलेल्या दिसल्यास नवल वाटू नये.

हेही वाचा:

The post भाजपच्या पालकमंत्री पदाचा बाण शिंदे गटाच्या भात्यात appeared first on पुढारी.