भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

गिरीश महाजन

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगावातील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्थेच्या प्रकरणात भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात सत्ता बदल होताच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

(Girish Mahajan) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करुन गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, नीलेश भोईटे, विरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांवर कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरुडमधील हॉटेल किमया व एका अपार्टमेंटमध्ये घडल्याने हा गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असे निर्देश गृह विभागाने दिले आहेत.

Girish Mahajan : फडणवीसांनी केली होती सीबीआय चौकशीची मागणी

आमदार गिरीश महाजन यांनी आधीच हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आल्याचा आरोप केला होता. नंतर त्यांनी या गुन्ह्यासह इतर आरोपांमध्ये अडकवून आपल्यावर मोक्का लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या संदर्भात विधानसभेत व्हिडीओच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत थेट व्हिडीओ क्लीप दाखवून खळबळ उडवून दिली होती. फडणविसांनी तेव्हा या प्रकाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तथापि, ठाकरे सरकारने याला धुडकावून लावले होते. आता याच प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार असल्याने यातून काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मला ड्रग माफिया ठरवण्‍याचा प्लॅन फसला : गिरीश महाजन

महाविकास आघाडीच्या सरकारने मला क्रिमिनल ठरवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात ते असफल राहिले. त्या साठी एका सरकारी वकिलाचा वापर केला, प्रवीण चव्हाणच्या माध्यमातून माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला मोक्का लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच मला ड्रॅग माफिया घोषित करण्यासाठी माझ्या गाडीत ड्रग ठेवण्याची तयारी देखील त्यांनी केली होती, हे कमी असताना माझ्यावर खंडणी, धमकी देण्यासारखे गुन्हे देखील लावले, मात्र यांची सर्व पितळ एका पेन ड्राइव्हने उघड केले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा पेन ड्राइव्ह सादर करून प्रवीण चव्हाण यांचा प्लॅन उघडा केला. या सर्व कटकारस्थानामागे अनिल देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या, असा आरोपही महाजन यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

The post भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग appeared first on पुढारी.