भाजप प्रवेशासाठी देशमुख आग्रही होते; गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

गिरीश महाजन, अनिल देशमुख,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे २०१९ च्या निवडणूकीपूर्वी भाजपात येण्यास आग्रही होते. भाजपा प्रवेशासाठी ते वारंवार आमच्याशी संपर्क साधत होते, असा खळबळजनक दावा राच्याचे वैद्यकीय शिक्षण गिरीश महाजन यांनी केला. गद्दारांचे सरकार अशी टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महाजनांनी निशाणा साधताना वर्षभरावर निवडणूका आहेत. त्यावेळी जनमताचा कौल दिसले, असा टोला त्यांनी ठाकरेंना लागवला.

राष्ट्रवादीचे नेते आ. अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणूकांपुर्वी भाजपाचा पक्षप्रवेशासाठी प्रस्ताव होता, असे विधान केले. सोमवारी (दि.१३) नाशिक दाैऱ्यावर आलेल्या ना. महाजन यांना याबद्दल विचारले असता देशमुख हेच भाजपात येण्यासाठी उत्सुक होते. प्रवेशासाठी त्यांनी सर्व बाजूंनी प्रयत्न केले. मात्र, आम्ही त्यांना प्रवेश दिला नाही, असा दावा महाजनांनी केला. त्यानंतर देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकत राज्याचे गृहमंत्रीपद मिळवले. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. पण याच देशमुखांनी नंतर शंभर कोटींचे हप्ते बांधून घेतल्याचे समोर आल्याचे सांगत देशमुख यांच्यात सरकार पाडण्याची धमक नाही. त्यामूळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देणे आवश्यक नसल्याचे सांगत जामिनावर बाहेर असलेल्या देशमुखांनी आरोपापेक्षा कायदेशीर लढाई लढावी, असा सल्ला महाजन यांनी दिला.

ठाकरेंनी जास्त डिंग्या मारू नये

भाजपाच्या जोरावर १८ खासदार निवडून आणलेल्या ठाकरे यांनी आमच्याच जोरावर विधानसभा जिंकल्या. नंतर आमच्याशीच गद्दारी करत हेच ठाकरे कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेे. त्यावेळी का नाही राजीनामा देत ठाकरे पुन्हा निवडणूकांना सामाेरे गेले नाही, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. घोडा-मैदानजवळ असून महापालिका त्यानंतर वर्षभरावर विधानसभा येऊन ठेपल्याचे सांगत ठाकरेंनी जास्त डिंग्या मारू नये, असा खोचक टोला महाजनांनी लगावला. जळगावमधील ईडीच्या धाडसत्र व चाैकशीतून सत्य समोर येईल, असेही महाजन म्हणाले.

अजित दादा चिंता करू नका

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूकीत गद्दार पडतील, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा समाचार घेताना महाजन यांनी गद्दारीची चिंता अजित दादा तुम्ही करू नका. पहाटेच्या शपथविधीवेळी मी तुमच्यासोबत होतो, अशी आठवण सांगतांना पुण्यात तुमचे काम असल्यास पोटनिवडणूका जिंकून दाखवा, असेही आव्हानही महाजन यांनी ना. पवार यांना दिले.

हेही वाचा :

The post भाजप प्रवेशासाठी देशमुख आग्रही होते; गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा appeared first on पुढारी.