Site icon

भारत जोडोसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते वाजतगाजत उत्साहात सहभागी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय एकात्मतेसाठी निघालेल्या खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी धुळे जिल्ह्यातील काँग्रेस, समविचारी पक्ष यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी आज धुळे येथून उत्स्फूर्तपणे रवाना झाले आहेत. यावेळी धुळे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेसाठी निघालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करीत उत्साहात निरोप दिला. दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांच्या समवेत पदयात्रेत सहभाग नोंदवला असून हा अप्रतिम क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज वाशिम येथे पोहोचली आहे. राहुल गांधींसोबत चालण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे आज वाशिम जिल्ह्याकडे आपल्या वाहनाने रवाना झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. भारत जोडो- नफरत छोडो,  जोडो जोडो- भारत जोडो, राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देत वातावरण एकात्मतेच्या भावनेने भारावून गेले होते. सकाळी धुळे शहरातील एसएसव्हीपी महाविद्यालयातील प्रांगणातून निघालेला वाहनांचा जत्था गांधी पुतळा-फुलवाला चौक- गोपाल टी हाऊस-पारोळा रोडमार्गे वाशिमकडे मार्गस्थ झाला.

सामाजिक संघटनांचा सहभाग – वाशिम येथे आज रवाना झालेल्या भारत जोडो यात्रेतील सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील काँग्रेससह समविचारी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करीत यात्रेसाठी निरोप दिला. सामाजिक कार्यकर्ते एसएसव्हीपीएस कॉलेजपासून थेट पारोळा चौफुलीपर्यंत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष किरण पाटील, रमेश दाणे, हेमंत मदाणे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, भगवान गर्दे,डॉक्टर दरबारसिंग गिरासे, लहू पाटील, डॉक्टर एस.टी. पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, पंढरीनाथ पाटील,अरुण पाटील, अशोक सुडके, राजेंद्र भदाणे, एन. डी. पाटील, सोमनाथ पाटील संतोष राजपूत, डॉ. दत्ता परदेशी, महिला काँग्रेसचे अध्यक्ष गायत्री जयस्वाल, प्रदीप देसले,आबा गर्दे,गणेश गर्दे, दिनेश भामरे,सागर पाटील, हरिश्चंद्र लोंढे, पोपटराव चौधरी, ॲड. मदन परदेशी, महंमद जैद , किरण पाटील, डाॅ. एस् टी. पाटील, नवल ठाकरे, जमील मन्सुरी, सुभाष काकुस्ते, प्रभाकर खंडारे, दीपकुमार साळवे यांच्यासह काँग्रेस समविचारी पक्ष व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

रस्त्याच्या दुतर्फा गर्दी…

खा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची संपूर्ण देशासह जगात चर्चा सुरू असून धुळे शहर आणि जिल्हावाशियांनाही या यात्रेचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज सकाळी पदयात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. यावेळी उपस्थितांनी हात उंचावून भारत जोडो यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

भारत जोडो पदयात्रेमध्ये आमदार कुणाल पाटील हे आधीच सहभागी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते आज संध्याकाळी वाशिम येथे पोहोचल्याबरोबर सहभागी होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील कार्यकर्ते उद्या सकाळी 6 वा. खा. राहुल गांधी यांच्यासोबत चालणार आहेत. आ.कुणाल पाटील आजही खासदार राहुल गांधींसोबत तसेच दुसऱ्या दिवशी फळेगाव हिंगोलीपासून तर अंजनखेडा वाशिमपर्यंत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post भारत जोडोसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते वाजतगाजत उत्साहात सहभागी appeared first on पुढारी.

Exit mobile version