मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

मंत्रीमंडळ विस्तार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी तयार असून, भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी सात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या यादीत नाशिकमधील एकही नाव नसल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय दिल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच हा विस्तार पार पडेल, असे वक्तव्य केले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेदेखील त्यास मंजुरी दिली आहे. दोन्ही पक्षांकडून सात-सात आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ दिली जाऊ शकते. येत्या आठ दिवसांत विस्ताराचा हा सोहळा पार पडेल, अशी शक्यता आहे. परंतु, दोन्ही पक्षांच्या संभाव्य यादीत नाशिक जिल्ह्यातील एकाही नावाचा समावेश नसल्याचे कळते आहे. त्यामुळे भाजपच्या आ. देवयानी फरांदे व डॉ. राहुल आहेर तसेच सेनेचे सुहास कांदे यांच्यावर पुन्हा एकदा तलवार म्यान करण्याची वेळ ओढावली आहे. गेल्या वर्षी जूनअखेरीस राज्यात सत्ताबदल होत शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवर तारखा समोर आल्या. पण राज्यातील सत्तासंघर्षामुळे शासनाने दरवेळी विस्तार टाळला. दरम्यानच्या काळात विस्ताराची चर्चा सुरू होताच नाशिकमधून भाजपच्या फरांदे, आहेर आणि सुहास कांदे यांच्या नावे आघाडीवर असायचे. मुख्यमंत्र्यांनीच यंदा विस्तारासाठी अनुकूलता दर्शविल्याने फरांदे, आहेर व कांदे यांच्या नावाची चर्चा होणे साहाजिकच होते. परंतु, भाजप-सेनेच्या संभाव्य यादीत यापैकी एकही नाव नसल्याचे समजते आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या तिघा लोकप्रतिनिधींना त्यांच्या इच्छेला तूर्तास मुरड घालावी लागू शकते.

तरीही प्रयत्न कायम
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून संभाव्य यादीही तयार आहे. या यादीत नाशिकच्या नावांचा तूर्तास समावेश नसल्याचे पुढे येत आहे. अशावेळी विस्तारात नाशिकला सामावून घ्यावे यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांकडून प्रयत्न कायम आहेत. या प्रयत्नांना यश मिळणार का? हे विस्तारानंतरच स्पष्ट होईल.

The post मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर? appeared first on पुढारी.