मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही उपरोधिक बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

संजय राऊतांनाही लगावला टोला…
चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना लगावला.

आदित्य ठाकरेंवर देखील टीकास्त्र …
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमान विकलेल्या लोकांचे सरकार लवकरच पडेल अशी टीका केली आहे. त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. ते वारंवार सरकार पडणार असल्याचं सांगत आहे. मीही किती दिवसांपासून तीच वाट पाहत आहे. सरकार म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का? चिमुकली दोरीवर चालतेय आणि खाली डोंबारी वाजवतोय. वाजू द्या. त्यांना काय वाजवायचं ते वाजू द्या, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

हेही वाचा:

The post मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही appeared first on पुढारी.