मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले

जळगाव : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. चिमणराव पाटील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही’, अशा शब्दांत चिमणरावांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. चिमणराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेतून बाहेर पडत गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यांच्याबरोबर किशोर पाटील, चिमणराव पाटील हे जिल्ह्यातील आमदारही शिंदे गटात गेले. मात्र शिंदे गटात सारे काही आलबेल नाही. जिल्ह्यात आपसामध्ये असलेली गटबाजी, धुसफूस घेऊनच बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत. नव्याचे नऊ दिवस सरताच ही धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शुद्रपणा करु नये, असं देखील चिमणराव पाटील म्हणाले.

सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा …

विकासकामांसाठी निधी देण्यात दुजाभाव होत असल्याने आमदार चिमणराव पाटील संतापले आहे. त्यामुळे त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. “तो राजकारणातला शुद्रपणा आहे. असं करु नये. सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाचं योगदान असतं. एक-एक मतावर सरकार येतं आणि कोसळतं, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखं! त्यामुळे मंत्री झालं म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं. सरकार आल्यामुळे तुम्ही मंत्री आहात. याचं भान तुम्ही कायम ठेवलं पाहिजे”, अशी टीका चिमणराव पाटील यांनी केली आहे.

The post मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले appeared first on पुढारी.