मंदिर विश्वस्त निवड : त्र्यंबकवासीयांना डावलल्याचा आक्षेप; पावणेदोन वर्षांनी मुलाखती

Nivrutti Maharaj www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचे विश्वस्त निवड करताना त्र्यंबकेश्वर शहरातील व तालुक्यातील एकही अर्जदार निवडीसाठी पात्र ठरला नाही. विश्वस्त मंडळावर 13 सदस्यांपैकी तीन सदस्य वंशपरंपरागत पुजारी गोसावी कुटुंबातील सदस्य आराखड्याप्रमाणे नियुक्त केले आहेत. मात्र, वारकरी भक्तांमधून नऊ सदस्यांची निवड करताना त्र्यंंबकेश्वर शहर आणि परिसरातील एकही व्यक्ती विश्वस्तपदासाठी पात्र ठरलेली नाही.

विश्वस्तपदासाठी जवळपास पावणेदोन वर्षांनी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तब्बल 185 अर्जदारांपैकी 40 व्यक्ती त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील होत्या. त्यापैकी चार व्यक्ती मृत झाल्या आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये मुलाखती झाल्या मात्र निवड जाहीर केली नाही. त्यानंतर मुलाखतींसाठी पुन्हा नव्याने अर्ज मागविले. त्यांच्या मुलाखती तब्बल पावणेदोन वर्षांनी घेत निवड जाहीर केली आणि विश्वस्त निवडीचे शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख सुरेश गंगापुत्र यांनी शनिवारी सकाळी तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीस शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या निवडीविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली. मंदिर परिसरात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. मात्र, स्थानिक विश्वस्त नसल्याने कामाच्या बाबत येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिकांना घेतलेले नाही. विश्वस्त मंडळावर स्थानिक सदस्य असल्यास नियोजनात त्याचा फायदा होतो, असा दावा ग्रामस्थांनी बैठकीत केला. बैठकीस वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कसबे, शहराध्यक्ष किरण चौधरी, पहिलवान शांताराम बागूल, भूषण अडसरे, अक्षय नारळे, किरण महाले, शेखर सावंत यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडीबाबत निवेदन पाठविण्याचा ठराव करण्यात आला. तसेच येथील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, त्र्यंबकवासीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post मंदिर विश्वस्त निवड : त्र्यंबकवासीयांना डावलल्याचा आक्षेप; पावणेदोन वर्षांनी मुलाखती appeared first on पुढारी.