Site icon

मकरसंक्रांत – 2023 : गई बोला रे… दे ढील… नाशिककरांनी लूटला पतंगोत्स्वा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इमारतींच्या गच्चीवर डीजेचा दणदणाट, रंगबिरंगी पतंगांनी सजलेले आभाळ आणि ‘गई बोला रे धिन्ना.. दे ढील…’चा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिककरांनी मकरसंक्रांतीचा सण साजरा केला. यावेळी युवावर्गाने पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी शहरवासीयांना आप्तस्वकीय व मित्रमंडळांनी तिळगूळ देत सणाचा गोडवा वाढविला.

नाशिक : पतंगोत्सवाचा आनंद लुटताना सोसायटीचे सर्व सदस्य.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी (दि. १५) मकरसंक्रांत सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. शहरातील मोकळी मैदाने तसेच इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी गर्दी झाली होती. युवावर्गासह बच्चेकंपनी तसेच ज्येष्ठांनी पतंग उडविण्याच्या आनंद लुटला. यावेळी युवतींचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. दुपारी दीड ते साडेतीन या कालावधीत हवा नसल्याने काहीकाळ पतंगप्रेमींचा हिरमोड झाला. मात्र, त्यानंतर हवेचा वेग वाढल्याने आकाशात रंगबिरंगी पतंगांची जुगलबंदी पाहायला मिळाली. पतंगासोबत डीजेच्या दणदणाटात नाशिककर थिरकले.

नाशिक : रंगबिरंगी पतंगांची जुगलबंदी व पतंग कापाकापी करण्यात व्यस्त असलेले बच्चेकंपनी.

शहरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी सायंकाळनंतर भाविकांची लगबग पाहायला मिळाली. तसेच काेरोनाचे संकट यंदा दूर सरल्याने नाशिककरांनी नातेवाईक व मित्रमंडळींची भेट देत त्यांना तिळगूळ वाटप केले. सुहासिनींनी श्री कपालेश्वर, तिळभांडेश्वरसह शहरातील भगवान शंकराच्या छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये आराधना केली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना वाण देत सणाचा गोडवा वाढविला.

सोशल मीडियातून शुभेच्छा…
मधुर सदैव वाणी असावी, कटूता स्नेहात कधी न यावी, रसगंधांची उधळण व्हावी. संस्कारांची मांदियाळी दिसावी, क्रांती विचारांची मनी ठसावी, तिन्ही लोकी कीर्ती व्हावी यांसह असे विविध शुभ संदेशांनी पहाटेपासून व्हॉटस‌्ॲपवर धडकले. फेसबुक, इन्स्टा, मॅसेंजर व अन्य सोशल माध्यमातून नेटिझन्स‌्नी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

नाशिक : कटलेली पतंग मिळविण्यासाठी भर रस्त्यावर धावणारा चिमुकला.  (सर्व छायाचित्रे : रूद्र फोटो/ गणेश खिरकाडे)

हेही वाचा:

The post मकरसंक्रांत - 2023 : गई बोला रे... दे ढील... नाशिककरांनी लूटला पतंगोत्स्वा आनंद appeared first on पुढारी.

Exit mobile version