मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअपने जात होते. मार्गातच मध्य प्रदेशातील जामठी गावाजवळ या वाहनाला आज (दि. ३०) सकाळी अपघात झाला. यात चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील ३ तरुण ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर येथील ११ तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअप वाहनाने जात होते. मात्र, मध्यप्रदेशच्या सीमेवर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पंकज प्रकाश बारेला (वय १७), जगदीश केरसिंग बारेला (वय १९), नीलेश शांतीलाल बारेला (वय २२) या तिघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. रस्त्यावरच पिकअप गाडी पलटी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे घटनास्थळावर ३ तरुण जागीच ठार झालेत. तर ६ जखमी झाले. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. जखमींची नावे अद्याप कळू शकली नाही. दरम्यान, अपघातामुळे पिकअप वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या घटनेमुळे वैजापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
—-
जखमींवर रुग्णालयात उपचार
जबर जखमी असलेल्या राहूल संजय बारेला जळगाव येथील खासजी रुग्णालयात दाखल केले. तर विवेक बारेला याला गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तर परशुराम जाश्या बारेला, दिलिप बारेला, राहूल बारेला या तिघांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार आहे.

The post मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी appeared first on पुढारी.