मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर

जळगाव: इंदौरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला खरगोणजवळ अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस आज (दि. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली नदीपात्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मदत पथक रवाना झाले आहे. बसमध्ये ४० ते ५० जण प्रवास करत होते. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला जात असून, मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस क्रमांक (एम.एच. ४०, एन. ९८४८) ही बस सकाळी ७.३०वाजेच्या सुमारास इंदूरहून अमळनेरकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहेत. यात बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांचा समावेश आहे.
—-
बचावकार्यात अडचणी…
धार जिल्ह्यात असलेला खलघाट पूल बराच जुना असल्याचे सांगण्यात येते. तेथून प्रवासी बस नर्मदा नदीत पडली. नदीचा प्रवाह जास्त असल्याने मदत आणि बचावकार्यात अडचणी येत आहेत. बसमधील २० ते २५ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा बचाव पथक शोध घेत आहे. नदीतून बाहेर काढलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी धार रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बस पुलावरुन कोसळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांना सर्वप्रथम बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि अन्य प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मदतीसाठी हेल्पलाईन जारी
जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहचले असून, बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु आहेत. मदतीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन संपर्कात असून, हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०९५५५८९९०९१ या क्रमांकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यलय नियंत्रण कक्ष ०२५७२२२३१८०, ०२५७२२१७१९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The post मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, 'इतक्या' जणांचे मृतदेह काढले बाहेर appeared first on पुढारी.