मध्य प्रदेशातील दोघा दुचाकी चोरट्यांना धुळ्यात बेड्या

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातील गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. दोघा चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन चोरटे दोन वेगवेगळ्या दुचाकी घेऊन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत तसेच संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, पंकज खैरमोडे, राहुल सानप, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकूर आदी कर्मचाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर सापळा लावला.  गोपनीय  माहितीनुसार एमएच ४६ एम क्यू 24 18 आणि एमपी 10 एमजे 86 44 या क्रमांकाच्या दुचाकी घेऊन दोन तरुण धुळे शहरात येत असल्याचे आढळले. या दोघांना चाळीसगाव रोड चौफुलीवर अडवून ताब्यात घेण्यात आले. त्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात चौकशी केली असता त्यांची नावे जिब्राईल हुसेन अहिर आणि तालीब मेहमूद पटेल असे असल्याचे समजले. संशयितांची अधिक चौकशी केली असता त्यांनी जुलवानीया येथील दुचाकी धुळे येथील त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवण्यासाठी घेऊन जात असल्याचे माहिती दिली. त्याचप्रमाणे नातेवाईकाकडे आणखी तीन दुचाकी नादुरुस्त असून त्या देखील ठेवल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाली करून या सर्व पाच दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही आरोपी मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामधून दुचाकींची चोरी करून दुचाकी विक्री करण्याचा गोरखधंदा चालवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित दोघांना जुलवानीया पोलिसांच्या ताब्यात देणार देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे. दरम्यान चौकशीनंतर दोघांना पुन्हा धुळे पोलीस ताब्यात घेणार असून दुचाकी चोरीच्या घटनांची चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post मध्य प्रदेशातील दोघा दुचाकी चोरट्यांना धुळ्यात बेड्या appeared first on पुढारी.