मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिककरोड मध्यप्रदेश राख,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील मालधक्क्यावर आलेली मध्य प्रदेशातील औष्णिक वीज केंद्राची राख नाशिकरोड परिसरातील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील अनेक दिवसांपासून या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का येथे 3 व 10 तारखेला मध्य प्रदेशातून वीजनिर्मिती केंद्राची राख येथील काही ठेकेदारांनी मागविलेली होती. मालधक्का येथे आलेल्या रॅकमधील राख खाली करून घेताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे ही सर्व राख परिसरातील वसाहतींमध्ये उडत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. राखेची वाहतूक करताना ट्रकचालक कोणतीही दक्षता घेत नाही. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र राख उडत असल्याचे दिसून येते. मागील अनेक दिवसांपासून त्रस्त झालेल्या नागरिकांनी याविषयी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, अद्याप यासंदर्भात कुठलीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कंपन्यांना पुरवठा
रेल्वे मालधक्का येथे आलेली राख दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीत त्याचप्रमाणे सिन्नर व जिल्ह्यातील वीटभट्टी तसेच काही बांधकाम व्यावसायिकांना पोहोच केली जात आहे. राखेच्या वाहतुकीदरम्यान राख उडून नागरिकांना त्रास होत आहे.

गुंडांची दहशत
राख वाहतुकीविषयी जाब विचारला असता, काही गुंडांकडून नागरिकांना धमकावले जाते. पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन
मालधक्का येथे रेल्वेने आणली जाणारी व नंतर ट्रकने वाहतूक केली जाणारी राख त्वरित थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, राष्ट्रीय दलित पँथर, माथाडी व सिटू कामगार युनियनने केली आहे. कार्यवाही न झाल्यास तीव— आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, नाशिकरोड स्टेशनमास्तर, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, नाशिकरोड पोलिस, महापालिका विभागीय अधिकारी आदींना निवेदन देण्यात आले. निवेदनावर कामगार नेते भारत निकम, रवि मोकळ, लालचंद शिरसाट, प्रभाकर रोकडे, कैलास भालेराव, सुभाष अहिरे, रवि जगताप, सुनील चंद्रमोरे, राकेश माने, राहुल अहिरे, सागर शार्दुल, आकाश गाडे, नंदकिशोर चंद्र मोरे, राजेश लेंडे आदी पदाधिकार्‍यांच्या
सह्या आहेत.

हेही वाचा :

The post मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पुढारी.