मनपा आयुक्तांची ‘म्युझिक थेरपी’

music www.pudhari.news

नाशिक : मनावर साठलेलं मळभ दूर सारत… अंगातील आळस झटकत एकदम ताजेतवाने करणारे सोल्युशन म्हणजे ‘म्युझिक थेरपी’. यासाठी कुणाला भेटायची गरज नाही… इतकच काय तर मूड चांगला होईपर्यंत अगदी जागेवरून हलण्याचीही गरज नाही. आवडीचं गाणं ऐका अन् ‘वर्क स्ट्रेस’ दूर सारा. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या ताजेतवाने दिसण्याबरोबरच सतत हसतमुख चेहर्‍यामागील रहस्य म्हणजे ‘म्युझिक थेरपी’ होय. नाशिक महापालिकेला राज्यात अव्वल नेणार्‍या आयुक्तांना कामातून कधी उसंत मिळत असेल?, या वेळेत त्यांचा दिनक्रम कसा, असे प्रश्न अनेकांना पडत असतील. तर या प्रश्नांचे एकच उत्तर ते म्हणजे ‘म्युझिक’ असे आहे.

दहा हजारांपेक्षा अधिक गाण्यांचा संग्रह असलेल्या आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना किशोरकुमार, मोहम्मद रफी या लिजेंडरी गायकांच्या गाण्यांची प्रचंड गोडी आहे. कामाच्या व्यापातूनही ते शक्य होईल तेव्हा जुन्या जमान्यातील गाण्यांच्या दुनियेत रममाण होतात. अर्थात ही गोडी जपण्यासाठी त्यांच्याकडून कामाचे तसे नियोजनही केले जाते. संबंध शहराचा कार्यभार हाकताना तासन्तास स्वत:ला कामात झोकून द्यावे लागते. ऑफिसबरोबरच निवासस्थानीही कामे सुरूच असतात. दौरे, बैठका तर नित्याच्याच. मोबाइलने जग जवळ आले, ही बाब खरी असली तरी ‘वर्क स्ट्रेस’ वाढविण्यात मोबाइल अव्वल ठरत आहे, ही बाबही नाकारून चालणार नाही. अशात ताणतणाव अदृश्यपणे डोक्यावर कधी स्वार होऊन जातो, याचा थांगपत्ता लागत नाही. मात्र, कामाचे योग्य नियोजन केल्यास जगणं अधिक आनंददायी बनविता येते, याचा वस्तुपाठच आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी घालून दिला आहे. विशेष बाब म्हणजे गाण्यांची आवड जोपासण्यासाठी भलीमोठी साउंड सिस्टिम असावी हे त्यांना कधीच गरजेचे वाटले नाही. कधी काळी त्यांच्याकडे एक जुना रेडिओ होता. आता त्यांच्याकडे एक ‘आयपॉड’ आहे. सहज कॅरी करता येईल, हाच त्यामागचा हेतू. या आयपॉडवरील गाणी कानावर पडल्याशिवाय क्वचितच दिवसाची सुरुवात होते. रात्रीही निवांतात ते गाणी ऐकतात. ‘सनदी अधिकारी अन् वेळ’ हे सूत्र जुळणे काहीसे अवघड असल्याने, बर्‍याचदा तर स्नानगृहातही ते गाणी ऐकण्याचा आनंद घेतात. त्यांची ही आवड आत्मविश्वास, एकाग्रता अन् वेळीच घ्यायच्या निर्णयामध्ये अचूकता प्रदान करण्यास काही अंशी मदत करते, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.

‘सलामे इश्क मेरी जान’
नाशिक महापालिकेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेल्या एका सोहळ्यात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘सलामे इश्क मेरी जान, जरा कबुल कर लो’ गाणे गाऊन सर्वांनाच अचंबित केले होते. त्यांच्या या गाण्याने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली होती. उपस्थित अधिकार्‍यांनी त्यांच्या या गाण्याला उत्स्फूर्त दादही दिली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा नवा पैलू समोर आल्याने, त्यांच्यातील गाण्याच्या आवडीची चर्चा तेव्हाच रंगली होती.
शब्दांकन : सतीश डोंगरे

हेही वाचा:

The post मनपा आयुक्तांची ‘म्युझिक थेरपी’ appeared first on पुढारी.