मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. यावरून, शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. ठाकरे गटाची ही टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

या टीकेवरून अनेकदा शिंदे गट आणि मविआ नेत्यांमध्ये वादाचे प्रसंगदेखील पाहण्यास मिळाले आहेत. मात्र, आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टिकेला उत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते.

मतदार संघात कामचं नाही

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट कबुलीच दिली. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.

गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो…

“तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली”, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

The post मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.