मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

CM of Maharashtra Eknath Shinde

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

मराठा समाजाचे दहा-वीस आमदार किंवा दहा- वीस नगरसेवक झाले म्हणजे तो पुढारलेला झाला असे म्हणणे कितपत योग्य होईल मला माहित नाही. परंतु  मराठा समाजाला आर्थिक मागास सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू सरकारकडून योग्य प्रकारे मांडली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते सारथी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  छत्रपती शाहू महारांजाच्या प्रेरणेतून आपण सर्वजण लोककल्याचा विचार घेऊन काम करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन या राज्याचा कारभार आपण सुरु केला आहे.  हे राज्य सर्वसामान्य लोकांचे आहे. या राज्यात सर्वसामन्याला न्याय मिळायला पाहीजे. सर्वांगीण विकास व्हायला पाहीजे.

राज्यातील कुणबी मराठा यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथी गेल्या चारपाच वर्षापासून काम करते आहे. मधल्या काळात थोडा वेग मंदावला होता. मात्र आता नवीन सरकार आले आहे. पुन्हा एकदा आपल्याला जोमाने काम करायचे आहे. एक चांगली वास्तू इथे उभी राहीली आहे. या वास्तूकडे केवळ वास्तू म्हणून न पाहाता यातून तरुणांचे भवितव्य घडविण्याचे काम  सारथीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. उदात्त हेतू ठेऊन आपल्याला या वास्तूचा उपयोग करायचा आहे. संस्थेचे बोधचिन्ह शाहू महाराजांचा राज मुकुट आहे. हा मुकुट सत्ताधीशाचा किंवा हुकुमशाहचा नसून, समाजातील दिनदुबळ्या व शोषितांच्या कल्याणासाठी लढा देणारे चिन्ह असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सारथी च्या जन्मापासूनच मी त्याचा साक्षीदार आहे. सारथीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणायच्या आहेत. त्यासाठी सरकार सोबत असून गरजू तरुणांना प्रशिक्षित करा अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी माजी खासदार युवराज संभाजी राजे, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार नरेंद्र दराडे, आमदार सीमा हिरे, आमदार किशोर दराडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

The post मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.