मविआ विधानसभेच्या १८० जागा तर लोकसभेच्या ३८ जागांवर विजयी होणार : बाळासाहेब थोरात

धुळे; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी निवडणूकसाठी तयार असून लोकसभेत 34 ते 38 आणि विधानसभेत 180 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी मुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना देव दर्शनाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेळाव्यासाठी आज राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यात महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी लोकसभेत 34 ते 38 जागा तर विधानसभेच्या 180 पेक्षा जास्त जागांवर विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राज्याचे मंत्रिमंडळ अयोध्या येथे दर्शनासाठी गेल्याचा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की देव दर्शनाला जाणे ही चांगली बाब आहे. मात्र कुटुंब व्यवस्थित राहिले म्हणजे देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना हा दौरा आयोजित केला आहे. देवदर्शन करणे ही चांगली बाब आहे. मात्र त्याची एवढी प्रसिद्धी करण्याचं कारण काय. राजकारणापेक्षा शेतकऱ्यांची काळजी घेतली तर शेतकरी आणि देव देखील आशीर्वाद देईल, असा टोला त्यांनी लावला.

देशात मतपत्रिकेवरच मतदान झाले पाहिजे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या कालावधीत मतदान अनुकूल होत असताना निकाल वेगळा लागल्याने ईव्हीएम बाबत शंका येते. या संदर्भात व्यक्तिगत मतांतर असू शकते. मात्र जगभरात नवीन टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या देशात देखील मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान होते. त्यामुळे भारतात देखील अशाच पद्धतीने मतदान झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी छोटे व्यापारी यांची अवस्था देखील खराब आहे. याकडे लक्ष देणे केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र जनतेचे लक्ष विचलित करणारे प्रश्न हाताळले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

The post मविआ विधानसभेच्या १८० जागा तर लोकसभेच्या ३८ जागांवर विजयी होणार : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.