मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

मविप्र निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील दुसर्‍या टप्प्याला बुधवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अवघ्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.18) व शुक्रवारी (दि.19) होणार्‍या माघारीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या माघारीसाठी दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाचा मोठा कस लागण्याची चर्चा मविप्र संस्थेच्या वर्तुळात आहे.

मविप्र पंचवार्षिक निवडणुकीत 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका संचालक पदांसाठी 410 अर्ज दाखल केले आहे. छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत माघारीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मनीषा दामोधर पाटील यांनी उपाध्यक्षपदाचा, साहेबराव गजानन हिरे यांनी मालेगाव तालुका संचालकपदाचा, रायभान गंगाधर काळे यांनी येवला तालुका संचालकपदाचा, तर संजय सुकदेव पवार यांनी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक संचालकपदाचा अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान, माघारीनंतर उमेदवारांना प्रचारासाठी आठ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. रविवारी (दि.28) मतदान, तर सोमवारी (दि.29) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशीच दुपारी 1 वाजता रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेच्या पटलावर विविध विषय असणार आहेत. तसेच संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक निकालाची नोंदही घेतली जाणार आहे.

हेही वाचा :

The post मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे 'इतके' उमेदवारी अर्ज मागे appeared first on पुढारी.