मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष

मविप्र निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याला मंगळवारपासून (दि.16) माघारीच्या रूपाने प्रारंभ झाला. पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक मंडळाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्जांसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत रविवारी (दि.14) संपली असून, या कालावधीत एकही हरकत दाखल झालेली नाही. आता माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सात दिवसांमध्ये जिल्हाभरातून विविध पदांसाठी तब्बल 305 उमेदवारांनी 410 अर्ज दाखल केले होते. कागदपत्रात त्रुटी असल्याने निवडणूक मंडळाने छाननीत 6 अर्ज बाद ठरविले. त्यामुळे या निवडणुकीसाठी 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका संचालकपदांचा समावेश आहे. निर्धारित मुदतीत कुठल्याही तक्रारदाराने अर्जाच्या नकलेची मागणी तसेच एकही हरकत दाखल केलेली नसल्याचे निवडणूक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलेMVP

दरम्यान, सोमवारी (दि.15) स्वातंत्र्य दिनानिमित्त निवडणूक कामकाज बंद होते. मंगळवार (दि.16) पासून निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्याला सुरुवात झाल्याने माघारीकडे लक्ष लागलेले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार माघारीसाठी उमेदवारांना शुक्रवार (दि.19) पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे माघारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अ‍ॅड. ठाकरेंचे निवडणूक मंडळाला पत्र
मविप्र निवडणूक पारदर्शी व नि:पक्षपाती पद्धतीने घेण्याच्या मागण्यांचे पत्र परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी निवडणूक मंडळाला दिले. मतमोजणी केंद्रात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मुबलक पोलिस बंदोबस्त तैनात करावा, मतपत्रिका मविप्र संस्थेच्या प्रिंटिंग प्रेसऐवजी त्रयस्थ ठिकाणांहून छापून बारकोड द्यावा, मतमोजणीच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नसावा, जनरेटची व्यवस्था करावी, निवडणूक अधिकारी – केंद्रप्रमुख – कर्मचारी हे बिगर मराठा समाजाचे असावेत, निवडणूक मंडळाने नेमलेल्या अधिकारी – कर्मचार्‍यांची अधिकृत यादी द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संपूर्ण निवडणूक पारदर्शी होण्यासाठी या आधीच नियोजन करण्यात आले आहे. कुठेही पक्षपातीपणा होणार नसल्याचे निवडणूक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

The post मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष appeared first on पुढारी.