मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अ‍ॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ऑगस्टमध्ये होऊ घातली आहे. सन 2017 च्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले असल्याचा आरोप करत यंदाही तीच परिस्थिती ओढविण्याची शक्यता असून, काही अघटित घटना नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर मविप्रच्या निवडणुकीला काही गालबोट लागण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने कार्यालयामार्फत राबविण्याचे साकडे आमदार अ‍ॅड. माणिक कोकाटे व माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदनाद्वारे घातले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या कार्यकारिणीच्या मर्जीतील कर्मचारीवर्ग निवडणुकीसाठी वापरला होता. संस्थेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मर्जीतील कर्मचार्‍याकडून मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे डुप्लिकेट मतपत्रिका छापून कर्मचारीवर्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरकारभार करून मतमोजणीमध्ये गोंधळ करण्यात आला होता. आताही संस्थेच्या घटनेची व भारतीय संविधानाची पायमल्ली करून सत्ताधार्‍यांना उपयुक्त नियमावली करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न विद्यमान कार्यकारी मंडळाने सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मागील मतमोजणीच्या काळात अचानक लाइट घालवल्याने मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय आला. तसेच अंधाराचा गैरफायदा घेण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे यावेळेस मतमोजणी काळात जनरेटरची पूर्ण वेळ व्यवस्था असावी. मतमोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था असल्याकारणाने अनधिकृत साहित्य मतमोजणीच्या ठिकाणी मज्जाव करण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या
मतमोजणी कक्षामध्ये व कक्षाबाहेर मुबलक सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे स्क्रीनवर सभासदांना दिसावी, त्याचप्रमाणे मतमोजणीच्या ठिकाणी व बाहेर मुबलक प्रमाणात पोलिस बंदोबस्तदेखील असावा, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ निरीक्षक नेमावेत, मतमोजणीच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास मनाई करावी.

हेही वाचा :

The post मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अ‍ॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.