महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : युवराज संभाजीराजे

युवराज संभाजीराजे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुठल्याही राजकीय पक्षांना आमचा विरोध नाही. मात्र, इतर पक्षांच्या बरोबरीने वाटा घेणार असून, सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हा स्वराज्याचा असणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. महाराष्ट्र नवा महाराष्ट्र निर्माण कराण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील गोरगरीब लोकांचे समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत, असे स्वराज्य स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केले.

गंगापूर रोड येथील गीताई लॉन्स येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने संभाजीराजे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संयोगिताराजे, युवराज शहाजीराजे, मुरलीधर पाटील, सुनील बागूल, माजी गटनेते विलास शिंदे, डाॅ. अशोक थोरात, माजी नगरसेवक सलिम शेख, ॲड. नितीन ठाकरे, कारगिल योद्धा नायक दीपचंद नायर, सुशीला गायकर आदी उपस्थित होते. यावेळी संभाजीराजे यांची ग्रंथ व पेढ्याने तुला करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व नाशिकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. राज्यातील नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात केक कापण्यात आला.

५२ वर्षांनंतर कोल्हापूर बाहेर वाढदिवस साजरा करण्यात आल्याने माझ्यासाठी आजचा नाशिकमधील क्षण अविस्मरणीय असा राहणार असल्याचे उद्गार युवराज संभाजीराजे यांनी काढले.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की संभाजीराजे, युवराज शहाजीराजे, माँसाहेब संयोगिताराजे या एकाच व्यासपीठावर आल्याने त्रिवेणी संगम योग जुळून आला आहे. हा कोणा राजकीय पुढारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा वाढदिवस नसून हा आमच्या आराध्यदैवताचा लोकउत्सव असल्याचे सांगितले. कुठल्याही पदाची अपेक्षा करता राजेंनी 70 टक्के महाराष्ट्राचा दौरा करत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 2024 मध्ये महाराष्ट्राची जनता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. राज्याची प्रतिमा आपणच बदलू शकत असल्याचे सांगत अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

नाशिकसह राज्यभरातून स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. शाहीर स्वप्निल ढुमरे यांनी शाहिरी सादर केली. शिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

The post महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : युवराज संभाजीराजे appeared first on पुढारी.