Site icon

महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरणने कोकण परिक्षेत्रात गुरुवारी (दि.17) धडक मोहीम राबवित एकाच दिवशी तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. यावेळी 25 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

कोकण परिक्षेत्राअंतर्गत महावितरणच्या सुरक्षा पथकांनी नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व कल्याण याठिकाणी जास्त वीजवापर असलेल्या आणि कमी वीजदेयक भरणार्‍या ग्राहकांच्या ठिकाणी तपासणी केली. यावेळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विजेचा गैरवापर करून येणार्‍या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. महावितरणच्या पथकांनी सदर ग्राहकांवर कारवाई करत तेथील वीजमीटर जप्त केले. जप्त केलेले मीटर हे महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासले असता 25 वीजग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. त्याचे मूल्यांकन केले असता या वीज ग्राहकांनी एकूण 7 लाख 44 हजार 114 युनिटचा वापर अनधिकृतपणे केल्याचे निदर्शनास आले. याचे मूल्यांकन 1 कोटी 22 लाख रुपये असून, तसे वीजदेयक ग्राहकांना देण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक सुमित कुमार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील, विजय सिंग, विद्युत पवार व धनंजय सातपुते यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

अशी पार पडली कारवाई…
महावितरणच्या सुरक्षा पथकाने ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 10, तर नाशिक व नगर जिल्ह्यांत प्रत्येकी दोन वीजचोरी पकडल्या. वीज चोरीची रक्कम ग्राहकांना कायद्यानुसार मुदत देण्यात आली आहे. जर विहित कालावधीत त्यांनी रक्कम न भरल्यास वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आगामी काळात वीजचोरांविरोधात कठोर मोहीम राबविली जाणार आहे.

हेही वाचा:

The post महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश appeared first on पुढारी.

Exit mobile version