महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

महिंद्रा इलेक्ट्रिकलचा 10 हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प नाशिकमधून पुणे येथे हलविला जात असल्याबाबतचा विषय नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित करीत उद्योगमंत्र्यांकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे महिंद्राचा प्रकल्प सुरू होत असल्याची बाब खरी आहे. परंतु, हा प्रकल्प नाशिकमधून वर्ग न होता नाशिकमध्येही महिंद्रा उद्योग समूह गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

नाशिक येथे येणारा महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट पुणे येथे जाणार असल्याची अफवा पसरवून नाशिकच्या लोकप्रतिनिधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचा आरोप आ. फरांदे यांनी केला होता. विविध प्रसारमाध्यमांतून उद्योगमंत्र्यांच्या आदेशाने नाशिक महिंद्रा इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पुणे येथे शिफ्ट होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यास राज्याच्या माजी मंत्र्यांनीही दुजोरा दिला होता. त्या अनुषंगाने आ. फरांदे यांनी उद्योगमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले होते.

याबाबत स्पष्टीकरण देताना नाशिक येथील महिंद्रा प्रोजेक्ट शिफ्ट करण्यात आल्याचे वृत्त निराधार व चुकीचे असून, महिंद्रा कंपनी पुणे येथे गुंतवणूक करीत आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथेही गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिक येथील कोणताही प्रकल्प अन्यत्र शिफ्ट होणार नसून, नाशिक येथे नव्याने महिंद्रा कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.

The post महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार appeared first on पुढारी.