माजी आमदार योगेश घोलप  : महाविकासची उमेदवारी मलाच ; शिंदे गटाच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही

उमेदवारी www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा शब्द मला वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी माहिती माजी आमदार योगेश घोलप यांनी दिली.

सद्या सुरू असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या प्रवेशासंदर्भात घोलप यांना विचारणा झाली असता त्यांनी याविषयी रोखठोक उत्तर दिले. नाशिकरोड परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्याप्रमाणे देवळाली विधानसभा मतदार संघ देखील तब्बल तीस वर्षे शिवसेनेचा म्हणजेच घोलप कुटुंबीयांचा बालेकिल्ला होता. तर राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे या आमदार आहेत. सद्या राज्यात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे. सद्याच्या राजकीय घडामोडी पाहता २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत ही आघाडी कायम राहू शकते. तसे झालेच तर विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी कायम केली जाऊ शकते. अशावेळी माजी आमदार योगेश घोलप यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे संभाव्य राजकिय परिस्थितीचा विचार करून योगेश घोलप हे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या राजकीय पक्षात आज ना उद्या निश्चितपणे प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठविण्यात येत आहे. तूर्त आपण शिंदे गटात जाणार नसून वेळेप्रसंगी योग्य तो निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया देखील घोलप यांनी यावेळी दिली.

भुजबळ – घोलप जवळीक ?
माजी मंत्री बबनराव घोलप अन् माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यात सद्या जवळीक निर्माण झालेली दिसते. भविष्यात योगेश घोलप शिंदे गटाऐवजी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवू शकतात असे बोलले जात आहे. मात्र विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचे मतदार संघातील काम, प्रतिमा अन् पवार कुटुंबासोबत असलेले राजकीय संबंध पाहता योगेश घोलप हे शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

घोलप यांचे स्वागतच
माजी आमदार योगेश घोलप यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली तरी स्थानिकांना विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या परवानगीने त्यांना प्रवेश दिला जाईल. त्यांचे स्वागतच होईल. परंतु त्यासाठी त्यांची इच्छा असणे आवश्यक आहे.

हेही वाचा:

The post माजी आमदार योगेश घोलप  : महाविकासची उमेदवारी मलाच ; शिंदे गटाच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही appeared first on पुढारी.