मालेगाव गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर ; आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा आदेश

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठकीत निष्क्रीय कामकाजाचा ठपका ठेवत मालेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दुसर्‍या अधिकार्‍याला कार्यभार द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना दिल्या. आढावा बैठक संपताच हा आदेश काढा, असेदेखील पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.11) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत व्यासपीठावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला 100 मॉडेल स्कूल आणि सुपर 50 या दोन उपक्रमांचा शुभारंभ झाला. सर्व सोयींनीयुक्त असलेले 100 मॉडेल स्कूल जिल्ह्यात तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग तसेच सर्व विभागांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. सुपर 50 हा अनोखा प्रयोग जिल्ह्यात होत आहे. यातून समाजातील योजनांपासून वंचित राहिलेला वर्ग मुख्य प्रवाहात येईल, असे सांगत दोन्ही उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या बांधकामच्या तिन्ही विभागांनी सादरीकरण व्यवस्थित केले नसल्याने त्याबाबत पालकमंर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेत असताना लम्पी या जनावरांच्या त्वचारोगाबाबत पसरलेली साथ जिल्ह्यात कशी आटोक्यात आणली, याबाबत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सांगितले. आतापर्यंत 58 जनावरांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत 30 जणांना अनुदान देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना आढावा घेण्यासाठी आमंत्रित करणार आहे. येत्या महिनाभरात हा आढावा होईल. जिल्ह्यातील एकही वाडी-वस्ती शुद्ध पाण्यापासून वंचित राहायला नको, असे सूक्ष्म नियोजन करा. येत्या काही वर्षात आपल्याकडे कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत महापालिका, जिल्हा परिषद यांनी एकत्रित नियोजन करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येतात त्यामुळे या दोन शहरांसाठी नियोजन अतिशय महत्वाचे राहणार आहे.

आपल्या जिल्ह्यात तालुके किती ?
पालकमंत्री भुसे यांनी आपल्या स्टाइलमध्ये शिक्षणाधिकारी पाटील यांची शाळा घेतली. मानव विकास मिशन या अंतर्गत जिल्ह्यातील ठरावीक तालुके येतात. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी सर्वच तालुक्यात असल्याचे सांगितले. पालकमंर्त्यांनी फेरतपासणी करत विचारले असता त्यांनी पुन्हा तीच री ओढली. मात्र, पालकमंर्त्यांनी तपासून सांगितले आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत तर 15 आणि ही योजना किती तालुक्यांना लागू आहे. तेव्हा शिक्षणाधिकारी पाटील यांनी नऊ तालुके असल्याचे सांगितले. एवढे सुरू असताना सभागृह मात्र हास्यात बुडले होते.

कंकरेज यांची चौकशी करा
कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्याबद्दल सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहे. तसेच आढावा बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित होत कंकरेज हे कधीच फोन उचलत नाही, कार्यालयात ठरावीक वेळीच उपस्थित राहतात, ठेकेदारांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करत आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या बाजूलाच खासगी कार्यालयातून ते कार्यभार सांभाळतात, असा घणाघाती आरोप केला. पालकमंत्री भुसे यांनी ते बैठकीला हजर का नाही, असा प्रश्न करताच त्यांच्या मातोश्रींना घेऊन ते दवाखान्यात गेल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी कोणत्या दवाखान्यात ते मला सांगा आणि त्यांच्या खासगी कार्यालयाची चौकशी करा, तसेच आतापर्यंत आलेल्या तक्रारींचा अहवाल बनवून शासनाकडे सादर करा, असा आदेश पालकमंत्री भुसे यांनी दिला.

हेही वाचा :

The post मालेगाव गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर ; आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा आदेश appeared first on पुढारी.