मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन

मालेगाव,www.pudhari.news

 मालेगाव मध्य : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेत वॉटरगेस या खासगी ठेकेदारामार्फत काम करणार्‍या घंटागाडी कामगारांनी किमान वेतन व वेळोवेळी देण्यात येणारा महागाई भत्ता या प्रमाणे आठ तास कामाचे वेतन लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.

मालेगाव महानगर पालिका येथे मे. वॉटरग्रेस प्रोडक्टस या खासगी ठेकेदारामार्फत काम करणारे घंटागाडी कामगार व चालक मालेगाव महानगर पालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. त्यांच्या अनेक कायदेशीर मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी वेळोवेळी मनपा आयुक्त व वॉटरग्रेस प्रोडक्टस यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. 21 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी आठ दिवसात प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही कामगारांचे प्रश्‍न सुटले नाहीत. यामुळे मंगळवारी (दि.24) संतप्त झालेल्या कामगारांनी थेट कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे.

कामगारांना महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेले किमान वेतन व वेळोवेळी येणारा माहागाई भत्ता याप्रमाणे 8 तास कामाचे वेतन कामगारांना वेतन त्वरित लागू करण्यात यावे. सन 2021-22 चा बोनस त्वरित अदा करण्यात यावा. पी. एफ. व ई. एस. आय. सी. त्वरीत लागू करण्यात यावे.

कामगारांना साप्ताईक सुट्टी, सणाच्या भरपगारी सुट्ट्या तसेच पीएलसीएल व एसएल त्वरीत लागु करावा. घंटागाडी कामगारांचा पगार त्यांच्या बँकखातेवर जमा करा आदी मागण्यांसाठी घंटागाडी कामगारांनी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हा सचिव तुकाराम सोनजे, तालुकाध्यक्ष रमेश जगताप, तालुका सचिव अजहर खान, तालुका सदस्य पंकज सोनवणे यांनी सागितले.

हेही वाचा : 

The post मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन appeared first on पुढारी.