मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

मालेगाव मनपा,www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 19) बहुप्रतिक्षित अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्याविषयी दुसर्‍या दिवशीदेखील मालेगावकर अनभिज्ञच होेते. प्रारुप यादीवर 36 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अखेर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.19) प्रसिद्ध केली. मात्र, त्याविषयी मनपा वर्तुळदेखील अनभिज्ञच राहिले.

मनपाच्या संकेतस्थळावरदेखील ही यादी प्रदर्शित होण्यात अडचणी येत होत्या. उपायुक्त राजू खैरनार यांनी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पाच लाख 90 हजार 998 लोकसंख्येला अनुसरून ही प्रभागरचना करण्यात आली आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 25,641, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 12, 284 इतकी आहे. 95 सदस्य निवडून द्यावयाचे असून, 32 प्रभागातील 31 तीन सदस्यीय, तर एक दोन सदस्यीय प्रभाग असेल. महिलांसाठी 48 जागा आरक्षित राहणार आहेत. त्यातील दोन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असतील आणि एक अनुसूचित जमातीसाठी राखीव असेल. सर्वसाधारण गटातील महिलांसाठी 44 जागा राखीव असतील.

दाखल हरकतींनुसार नेमके कोणते बदल झालेत, याविषयी माहिती मिळू शकली नाही. भौगौलिक हरकती या विचारात घेतल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या प्रभागरचनेला स्थगित मिळण्याची शक्यता आहे. अंतिम प्रभागरचनेत ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नाही. त्याबाबतचा न्यायालयीन आदेशप्राप्त झाल्यानंतर पुन्हा फेरबदल होतील, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.