“मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”

खासदार गोडसे www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
टाकेद गटात आम्ही पाठपुरावा करून मंजूर केलेल्या कामांव्यतिरिक्त काही कामे असतील तर त्यांचा आराखडा दाखवा. पिंपळगाव मोर ते बारी रस्त्यातील अतिक्रमणे आम्ही सांगितल्याप्रमाणे जनतेने काढली आहेत. तसेच गटातील 21 गावांचा जलजीवन मिशनचा निधी हा केंद्राचा निधी असतो. त्याचेदेखील श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय तुम्ही घेऊ नका, नाहीतर गाठ नाशिकच्या गोडसेंबरोबर आहे, असे प्रतिआव्हान खासदार हेमंत गोडसे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना दिले आहे. मी बाहेरून आलेला भुजबळ किंवा आव्हाड नाही हे कोकाटेंनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.

तालुक्यातील टाकेद गटातील पिंपळगाव मोर ते बारीपर्यंत रस्ता कामाचा श्रेयवाद आता चांगलाच रंगला आहे. आमदार कोकाटे व खासदार गोडसे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाच आव्हान देऊ केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे. एकाच रस्त्याचे एकामागे एक असे दोन्ही लोकप्रतिनिधींनी भूमिपूजन केले. त्यात आमदार कोकाटे यांनी विकासकामांचे श्रेय लाटू नका, अन्यथा पुढच्या लोकसभा निवडणुकीला गाठ माझ्याशी आहे, असे आव्हान खासदार गोडसे यांना दिले होते. यावर खासदार हेमंत गोडसे यांनीही बुधवारी (दि.23) पत्रकार परिषद घेत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. पिंपळगाव मोर ते बारीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यकाळात प्रस्तावित केले होते. तो आत्ता मंजूर झाला असून, प्रशासकीय मान्यता वगैरे आमचा पाठपुरावा आहे. विकासकामे कोणी मंजूर केली हे तपासून बघा, प्रशासकीय मान्यता झाल्याशिवाय भूमिपूजन होत नाही, हे सरपंचासारख्या व्यक्तीला कळते. मात्र कोकाटे आमदार असताना त्यांना कळत नाही याचे नवल वाटते, असेही खा. गोडसे म्हणाले.

‘पुरावे घेऊन चर्चेला या’…
असेलच पुरावे तर बसा एकत्र आणि सिद्ध करा. उगाच जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. निवडणुका जवळ आल्या म्हणून यांना आदिवासी भाग दिसतोय मात्र जनता इतकी दूधखुळी नाही, असे शिंदे गटाचे बाळा गव्हाणे म्हणाले. मागील वर्षी तालुक्यातील वासळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नसल्याचे खासदार गोडसे यांनी निदर्शनास आणले.

कोकाटे यांनी शासकीय आदेश नसताना वासळी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकाचे भूमिपूजन केले. शंभर एकर जागेवर शंभर कोटींचे स्मारक होणार, अशी दिशाभूल केली आहे. – साहेबराव बांबळे, राघोजी भांगरे शासकीय समिती सदस्य.

हेही वाचा:

The post "मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी" appeared first on पुढारी.