मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!

मुख्यमंत्री www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून आधीच्या सरकारपेक्षा आम्ही अनेक पटीने दिले, तरी आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर होऊ द्या. आपण आपले काम करत राहू. कोणी बोलले, तर बोलू द्या. कोणी बांधावर जातंय, जाऊ द्या. कारण काम केलंच पाहिजे. सरकारमधले असो की, बाहेरचे असो, त्या सगळ्यांना आपणच कामाला लावलंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या शरसंधान केले.

नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी जाहीर भाषणात ते बोलत होते. उद्धव ठाकरे गटाकडून होणार्‍या टिकेचा खरपूस समाचार शिंदे यांनी आपल्या भाषणात घेतला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार प्रहार केले. राज्यात ओल्या दुष्काळावरून सुरू असलेल्या राजकारणासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून, आमच्या सरकारने अनेक प्रकारच्या मदतीचे वाटप केले. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत आणि ते म्हणजे खोके आणि ओके. त्यापेक्षा ते अधिक काहीही बोलत नाहीत. परंतु, मागच्या त्यांच्या अडीच वर्षांत झाले नाही, एवढी कामे आम्ही चार महिन्यांत केली. पुढील दोन वर्षांत काय चित्र राहील, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आमची ही गतिमानता सगळ्यांना आपणच कामाला लावलंय! पाहून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. उद्योग इकडे-तिकडे जात असल्याबद्दल आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. पण, योग्य वेळ आल्यानंतर मी त्याचे ठोस उत्तर देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, राज्यात लवकरच मोठे उद्योग आलेले दिसतील, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

खर्‍या अर्थाने जनतेचे, गतिमान सरकार असल्याचा जाहीर पुरावा…

याच कार्यक्रमातील भाषणात नंदुरबार नगर परिषदेतील विकासकामांशी संबंधित सात कोटी 28 लाख रुपयांचा प्रलंबित निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाषणातून मांडली. त्याक्षणी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दूरध्वनी करून अवघ्या तीन मिनिटांत त्याचा जीआर काढण्याची व्यवस्था केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, भाजप आणि बाळासाहेब शिवसेना पक्षाचे युती सरकार हे खर्‍या अर्थाने जनतेचे, गतिमान सरकार आहे, याचा हा जाहीर पुरावा देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलिस कवायत मैदान येथे आगमन झाले, त्यावेळी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांचेही आगमन झाले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, ना. अब्दुल सत्तार, ना. दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, खासदार राजेंद्र गावित, आमदार किशोर दराडे, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळा गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे  स्वागत केले.

हेही वाचा:

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय! appeared first on पुढारी.