मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगाव जिल्हा घोषित, कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून (दि.29) दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, मालेगाव येथे ते नाशिक विभागाचा आढावा घेणार आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयामधून जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेवर मालेगावचा जिल्हा म्हणून उल्लेख करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात सत्तांतर होऊन शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या नाशिक दौर्‍यातही पाहायला मिळतो आहे. मुख्यमंत्री शिंदे प्रथमच हे शुक्रवारी (दि.29) जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, मालेगावी ते मुक्कामी असतील. शनिवारी (दि.30) मुख्यमंर्त्यांच्या उपस्थितीत तेथील क्रीडा संकुलात विभागातील पाचही जिल्ह्यांची आढावा बैठक बोलविली आहे. त्यामुळे दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मालेगावात मुख्यमंत्र्यांनी विभागाची बैठक बोलविल्याने या आधीच विविध चर्चांना उधाण आले. याच बैठकीत मालेगाव जिल्हा निर्मितीबाबतही प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आता या बैठकीकडे लागले आहेत. त्यातच मंत्रालयामधून गुरुवारी (दि. 28) जिल्हा प्रशासनाला मुख्यमंर्त्यांचा प्राथमिक दौर्‍याचा कार्यक्रम उपलब्ध झाला. दौर्‍याच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंर्त्यांचा मालेगाव जिल्हा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून नजरचुकीने असा उल्लेख केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, मुख्यमंर्त्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगावचा जिल्हा म्हणून नामकरण झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा ः मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी (दि.30) सकाळी 10 ला नाशिक विभागातील अतिवृष्टी, प्रकल्पासंदर्भात बैठक घेतील. दुपारी 11.30 ते 11.45 यावेळेत विविध विकासकामांचे उद्घाटन करणार असून, त्यानंतर दुपारी 12.15 ला शिवसेना पक्षाची जाहीर सभा होईल. तसेच दुपारी 3 ला मालेगावकडून ते औरंगाबादकडे प्रयाण करतील. दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी गुरुवारी (दि.28) आढावा घेत अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविली आहे.

हेही वाचा :

The post मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगाव जिल्हा घोषित, कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख appeared first on पुढारी.