मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात निश्चितच विकासाचे निर्णय होतील : दादा भुसे

दादा भुसे www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘मुख्यमंत्री शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय दौर्‍याचा प्रारंभ मालेगावपासून होत आहे. त्याअंतर्गत नाशिक महसूल विभागाची आढावा बैठक होऊन त्यात निश्चितच मालेगावच्या विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय होतील, असा विश्वास माजी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी (दि. 30) मालेगाव दौर्‍यावर येत आहेत. त्याविषयी माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी (दि. 29) रात्रीच मुख्यमंत्री मुक्कामी येतील. सकाळी 10 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांची आढावा बैठक होईल. त्यात प्रामुख्याने पर्जन्यमान, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, विकासकामांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर कॅम्प पोलिस ठाणे, अधिकारी – कर्मचार्‍यांच्या नूतन वसाहतीचे लोकार्पण करण्यात येईल. याशिवाय, बोरी – अंबेदरी व दहिकुटेह कालवा बंदिस्तीकरण (25.21 कोटी), काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल उभारणी (169.24 कोटी), महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर रस्ते विकास प्रकल्प (129.69 कोटी) आणि जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनांचे (104 कोटी) ऑनलाइन भूमिपूजन होणार आहे. दुपारी 12.15 वाजता कॉलेज ग्राउंडवर सभा होईल. तत्पूर्वी मालेगाव जिल्हानिर्मिती, पश्चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी करणे, अमृत योजनेच्या टप्पा क्रमांक दोनला मंजुरी देण्याविषयी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार असल्याचे आमदार भुसे यांनी सांगितले.

जिल्हानिर्मितीच्या घोषणेविषयी उत्सुकता कायम ठेवत त्यांनी, ही मोठी प्रक्रिया आहे. कोणत्याही तालुक्याचा विरोध डावलण्यात येणार नाही. मनमाडसह इतर तालुकेनिर्मितीही प्रस्तावित आहे. बागलाण, देवळा, नांदगाव आणि मालेगाव मिळून जिल्हानिर्मिती शक्य आहे. टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले. पूर्ववाहिनी नद्यांच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वी केंद्र स्तरावरून झाले आहे. या प्रकल्पासाठी मोठा निधी आणि वेळ लागेल. परंंतु, भविष्यासाठी या योजनेला गती द्यावीच लागणार आहे. त्याची सुरुवात लवकरच करण्याचा प्रयत्न असेल.

मालेगावनंतर मुख्यमंत्री मनमाडमार्गे संभाजीनगरला जाणार आहेत. मनमाडच्या एकात्मता चौकात स्वागत सत्कार आणि महत्त्वाकांक्षी करंजवण योजना, 56 खेडी योजनेची टेंडर नोटीस देण्यात येईल. शिवाय विविध संघटनांच्या भेटीगाठी होतील, अशी माहिती आमदार कांदे यांनी दिली.

हेही वाचा :

The post मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात निश्चितच विकासाचे निर्णय होतील : दादा भुसे appeared first on पुढारी.