मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध

निओ मेट्रो,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाची स्थिती काय हे सांगणे मुश्किल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल असल्याचे दोन वर्षांपासून बोलले जात आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय होत नाही. असे असताना मेट्रो कार्यालयासाठी सातपूर किंवा अंबड एमआयडीसीमध्ये जागेचा शोध सुरू असल्याचे समजते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना मेट्रो निओची भेट दिली होती. सन 2020 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली. त्यावेळी सन 2023 मध्ये प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येईल, अशी घोषणा केली होती. परंतु अद्यापपर्यंत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पंतप्रधान कार्यालयात फाइल अडकून पडल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्प आवडल्याने वाराणसीमध्ये प्रकल्प साकारायचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन होईल असे सांगितले गेले, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघातदेखील टायरबेस मेट्रोचा प्रकल्प साकारायचा असल्याने नाशिकचा प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे. प्रकल्प रखडल्याने लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून प्रश्न विचारला जात आहे. असे असताना मेट्रो निओ प्रकल्पाबाबत नवीन घडामोड समोर येत असून, मेट्रो निओ प्रकल्प साकारण्यासाठी कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे. सातपूर किंवा अंबड औद्योगिक कार्यालयात जागेचा शोध सुरू आहे. महापालिकेकडे मुख्यालयात जागेची मागणी करण्यात आली होती परंतु महापालिकेने जागा देण्यास नकार दिल्याचे समजते.

हेही वाचा:

The post मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध appeared first on पुढारी.