मो. पैगंबर जयंती शोभायात्रा : आक्षेपार्ह घोषणाप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा – हिंदुत्ववादी संघटना

मोर्चा www.pudhari.news
धुळे: पुढारी वृत्तसेवा 
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. आक्षेपार्ह घोषणाप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तर पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शोभायात्रेमध्ये जमावातील एका गटाने आक्षेपार्ह घोषणा दिल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार सोमवारी (दि.10) भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे, नगरसेवक हिरामण गवळी, तसेच हर्षल विभांडिक ,प्रभा परदेशी यांच्यासह सनातन संस्था आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरु शिष्य स्मारकापासून मूक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यानंतर शिष्टमंडळाने प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, तसेच डीएसबी चे आनंद कोकरे हे उपस्थित होते. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये देण्यात आलेल्या घोषणा संदर्भातील तक्रार प्रशासनाला दिली. घोषणेमध्ये जीवे ठार करण्याच्या उद्देशाने संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्तरावर या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वादग्रस्त क्लिप पाहून यात सत्यता तपासून कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले. त्याचप्रमाणे शोभा यात्रेमध्ये अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा दिल्याची नोंद पोलीस ठाणे स्तरावर घेतली जावी. त्यातून पुढील वर्षी शोभायात्रेची परवानगी मागण्यासाठी आलेल्या आयोजकांना जमावावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देणे शक्य होईल असे पाटील यांनी सुचवले.

हेही वाचा:

The post मो. पैगंबर जयंती शोभायात्रा : आक्षेपार्ह घोषणाप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा - हिंदुत्ववादी संघटना appeared first on पुढारी.