Site icon

यात्रोत्सव : पन्नास हजार भाविक खंडोबाचरणी लीन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर मनेगाव येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवत बेल भंडार्‍याची उधळण केली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नामघोषाने मनेगावनगरी दुमदुमली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित झालेली यात्रा दोन वर्षांनंतर प्रथमच होत असल्याने भाविक देवदर्शनासाठी आसुसलेले होता. यात्रेस चाकरमान्यांसह पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच माहेरवाशिणींनी अलोट गर्दी केली. सुमारे 50 हजारांहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत कुलदैवताचे दर्शन घेतले. चंपाषष्ठीनिमित्त पहाटे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष विलास सोनवणे, सरपंच संगीता शिंदे आदींनी खंडेराव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक केला. सकाळी 8.30 वाजता सजवलेल्या पालखीत मुखवट्यासह दीडशेहून अधिक कावडीधारकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी 7.30 वा. धारणगाव येथील भक्त लक्ष्मण काळे यांनी मनेगावच्या बारागाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली. गुरेवाडी येथून आलेल्या मानाच्या काठीचे विधिवत पूजन केले. काठी मिरवणूक झाल्यानंतर खंडेरायाचे भक्त लक्ष्मण काळे यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढल्या. फटाक्यांची आतषबाजी व रोषणाईने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवट्या बुधल्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला. यात्रोत्सव शांततेत व अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

101 कावडीधारकांना आंब्याचे रोपटे वाटप
वृक्षमित्र परिवार, यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कावडीधारकांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेे. वृक्ष परिवारातील सदस्य मधुकर घोडेकर यांनी त्यांचे वडील कै. लक्ष्मण घोडेकर यांच्या स्मरणार्थ 101 कावडीधारकांना मान्यवरांच्या हस्ते केशर आंब्याच्या झाडाचे वाटप केले. श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष भारत सोनवणे यांनीही कावडीधारकांचे स्वागत केले. पोलिस निरीक्षक मुटकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.

विकी मोरे यांना कुस्ती स्पर्धेत मानाचा चषक
दरम्यान, दुसर्‍या दिवशी दुपारी 4 वाजता कुस्त्यांची दंगल पार पडली. पंचक्रोशीसह जिल्हाभरातून नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. डावपेच टाकत उत्कृष्ट कुस्त्यांच्या खेळाचे प्रदर्शन झाले. गावकर्‍यांच्या वतीने मल्लांवर अकरा रुपयांपासून अकरा हजार रुपयापर्यंत बक्षिसांची लयलूट केली. शेवटी चुरशीच्या झालेल्या कुस्तीपटूंना श्री नाम फाउंडेशनतर्फे भारत सोनवणे यांच्या हस्ते पैलवान विकी मोरे यांना 11 हजार रुपये रोख व मानाचा चषक प्रदान करण्यात आला. तर बरोबरीत असलेले दुसरे पैलवान स्वराज पाटील यांना रोख 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

हेही वाचा:

The post यात्रोत्सव : पन्नास हजार भाविक खंडोबाचरणी लीन appeared first on पुढारी.

Exit mobile version